पुणे : बांधकाम, मिळकत कराची विक्रमी झेप; पालिकेच्या उत्पन्नात भर | पुढारी

पुणे : बांधकाम, मिळकत कराची विक्रमी झेप; पालिकेच्या उत्पन्नात भर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचा बांधकाम विभाग आणि मिळकत कर विभागाने चालू आर्थिक वर्षात कुठल्याही योजनांशिवाय अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठले आहे. या वर्षी बांधकाम विभागाला अंदाजित उत्पन्नापेक्षा 163 कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळाले असून, मिळकत कर विभागानेही मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 125 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळविले. या विभागाने एकूण 1 हजार 964 कोटींचा महसूल प्राप्त करून दिला आहे.

कोरोना काळातही महापालिकेचा कर प्रामाणिकपणे भरणार्‍या पुणेकरांनी या वेळी सातत्य राखले आहे. मिळकत करातील 40 टक्के सवलत रद्द झाल्यानंतर आलेल्या वाढीव बिलांचा भरणा करू नये, असे जाहीर केल्यानंतरही पुणेकरांनी तब्बल 1 हजार 964 कोटी रुपये कराचा भरणा केला आहे. मागील आर्थिक वर्षात (2021-22) स्थायी समितीच्या माध्यमातून थकबाकीदारांसाठी दोनवेळा अ‍ॅमिनिटी योजना राबविण्यात आली होती. त्या वेळी 1 हजार 840 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.

चालू आर्थिक वर्षात प्रशासकराज असताना महापालिका प्रशासनाने तब्बल 64 हजार नवीन मिळकतींची कर आकारणी केली. यातून महापालिकेला सुमारे 404 कोटी रुपये कर मिळाला. यासोबतच मिळकत कर विभागाच्या अधिकार्‍यांनी कर आकारणी न झालेल्या 11 हजारांहून अधिक मिळकती शोधून काढत त्यांची आकारणी केली. साइड मार्जिनचा वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांकडूनही या जागेची कर आकारणी केली. त्यामधून 13 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि. 31) संध्याकाळी सात वाजेपर्यंत 41 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले, अशी माहिती कर आकारणी व संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली. महापालिकेच्या बांधकाम विभागाने 2022-23 या आर्थिक वर्षात 1 हजार 400 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतु, प्रत्यक्षात 1 हजार 563 कोटी रुपये मिळाले. समाविष्ट गावांतील बांधकाम परवानगीचे अधिकार लवकरच पालिकेकडे येतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न आगामी काळात वाढेल, असा विश्वास शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी व्यक्त केला.

Back to top button