पुणे : कृषी विभागात सेवानिवृत्ती दिवशी पदोन्नतीचा पायंडा कायम | पुढारी

पुणे : कृषी विभागात सेवानिवृत्ती दिवशी पदोन्नतीचा पायंडा कायम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कृषी विभागात सेवानिवृत्तीच्या दिवशी पदोन्नती देण्याचा पायंडा अधिकच वृध्दिगंत होत चालला आहे. कृषी उपसंचालक पदावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर 31 मार्चला सेवानिवृत्त होणार्‍या तीन अधिकार्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, कृषिमंत्री अब्दुल सत्तार नव्याने सुरू झालेल्या या प्रथेला पूर्णविराम देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कृषी आयुक्तालयातील उपसंचालक शिरीष जाधव यांची पदोन्नती सेवानिवृत्तीच्या दिवशी 31 जानेवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाली. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी कृषी उपसंचालक असलेल्या 3 अधिकार्‍यांना जिल्हा अधीक्षकपदी बढती मिळाली. त्यामध्ये रवींद्र कांबळे (कुर्डुवाडी-सोलापूर), अनिल भोकरे (जळगाव), चंद्रकांत गोरड (वाई-सातारा) यांचा समावेश असून, 28 फेब्रुवारीची सेवानिवृत्ती नव्या ठिकाणी पदभार घेण्यात गेली.

अशाच पध्दतीने 31 मार्च रोजी तीन अधिकार्‍यांना जिल्हा अधीक्षकपदी बढती देण्यात आली. त्यामध्ये भीमराव रणदिवे (जालना), पांडुरंग सिगेदार (पुणे) आणि दिलीप देवरे (नाशिक) यांचा समावेश आहे. त्यामुळे बढती कधी मिळणार तर सेवानिवृत्तीच्या दिवशी, असाच पायंडा मागील सलग तीन महिन्यांपासून सुरू झाल्याने नाराजीचा सूर उमटत असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button