वालचंदनगर : भरणेवाडी अभयवनातील पाणवठे कोरडेठाक

वालचंदनगर(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : भरणेवाडी येथील अभयवनात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्या कोरड्याठाक पडल्या आहेत. परिणामी, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. या परिसरात शेकडो हेक्टर क्षेत्रावर अभयवन आहे. या वनात चिंकारा जातीची हरणे, लांडगे, कोल्हे, ससे आदी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर अधिवास आहे. सध्या या परिसरात तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने नागरिकांसह प्राण्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.
दरम्यान, येथील वनात वन विभागाने ठिकठिकाणी वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी जमिनीवर सिमेंट टाक्या बांधलेल्या आहेत. मात्र, मार्च महिना संपला तरी अद्याप या टाक्यांमध्ये एकही थेंब पाणी ओतण्यात आले नाही. परिणामी, वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येत आहेत. साहजिकच वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असून, याकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे. अनेक ठिकाणी चिंकारा व सशांवर पाळीव कुर्त्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.
प्रामुख्याने या अभयवनात पर्यटकांना वन्यप्राण्यांचा अधिवास पाहता यावा म्हणून कोट्यवधींचा खर्च करून टेहळणी कक्ष, विविध पशुपक्ष्यांचे देखावे, पर्यटकांसाठी बैठकव्यवस्था केली आहे. परंतु येथील वन कर्मचारी प्राण्यांना पिण्यासाठी पाणीही वेळेवर सोडत नसल्याने वन्यप्राणी स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासनाने पर्यटन विकासासाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता असून, वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.