प्रभाग रचनाही नव्याने करावी लागणार; उरुळी-फुरसुंगी हद्दीबाहेर गेल्याचा फटका | पुढारी

प्रभाग रचनाही नव्याने करावी लागणार; उरुळी-फुरसुंगी हद्दीबाहेर गेल्याचा फटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उरुळी देवाची आणि फुरसुंगी आता अधिकृतरीत्या महापालिकेच्या हद्दीबाहेर गेल्याने आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार आहे. त्यामुळे आता न्यायालयाचा निर्णय आला तरी नव्याने प्रभागरचनेच्या प्रक्रियेमुळे निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट आहे. महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार ही प्रभागरचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी गतवर्षीच गेलेली आहे. मात्र, राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने 2017 नुसार चार सदस्यीय प्रभागरचना पद्धतीने महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यासंबधीच्या सूचना पालिकेला असल्यातरी अद्याप चारची प्रभागरचना झालेली नाही.

त्यात यासंबधी न्यायालयात परस्पर-याचिकाही दाखल झाल्या असून, सध्या त्यावर न्यायालयात सुनावण्या सुरू आहेत. मात्र, जर न्यायालयाने तीन सदस्यीय प्रभागरचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तरी आता उरुळी-फुरसुंगी पालिकेतून बाहेर पडल्याने त्यांना वगळून नव्याने संपूर्ण रचना करावी लागेल. तर चार सदस्यीय प्रभागावर शिक्कामोर्तब झाले तरी 2017 नंतर तब्बल 32 गावांचा समावेश झाला आहे.

2017 ची प्रभागरचना कायम न ठेवता पुन्हा नव्याने चारची रचना करावी लागेल. एकंदरीतच तीन अथवा चार सदस्यीय प्रभाग रचनेचा कोणताही निर्णय आला तरी पुण्यात मात्र नव्यानेच रचना करावी लागणार असल्याचे निश्चित आहे. या सर्व प्रकियेसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे आता न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले तरी पुढील एप्रिल व मे महिन्यात त्या घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे थेट दसरा-दिवाळीतच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Back to top button