निरा येथील ज्युबिलंट कंपनीत अ‍ॅसिड गळती | पुढारी

निरा येथील ज्युबिलंट कंपनीत अ‍ॅसिड गळती

निरा(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : निरा येथील सीमेवर असलेल्या ज्युबिलंट इन्ग्रेव्हिआ कंपनीत अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडची गळती झाली. त्यामुळे कंपनी परिसरात उग्र वास पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कंपनीच्या सुरक्षेबाबत निरेकरांमध्ये शुक्रवारी (दि. 31) दिवसभर उलटसुलट चर्चेला उधान आले. मात्र, कंपनी प्रशासनाकडून कोणतीही दुर्घटना झाली नसल्याचे सांगण्यात आले.

निरा-निंबूत येथील ज्युबिलंट इन्ग्रेव्हिआ कंपनीच्या एका प्लांटमध्ये अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड वाहून नेणार्‍या पाइपच्या जोडमध्ये असलेले रबर उन्हाळ्यामुळे खराब झाले होते. शुक्रवारी (दि. 31) सकाळी साडेअकराच्या सुमारास त्या जोडमधील दुरुस्तीचे काम सुरू होते. त्या वेळी त्या वहननलिकेच्या जोडमधून दहा मिनिटे अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडची गळती झाली. अ‍ॅसिडगळती होऊन उग्र वास येत असल्याचे वृत्त निरा गावात वार्‍यासारखे पसरले.

यामुळे निरा गावासह परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तसेच ज्युबिलंट कंपनीच्या कॉलनीमधील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. निरेकर नागरिकांमध्ये 17 एप्रिल 2019 रोजी झालेल्या वायुगळतीच्या दुर्घटनेची चर्चा दिवसभर सुरू होती. दरम्यान, कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडची गळती काही क्षणापूर्वी झाली होती. देखभाल दुरुस्तीदरम्यान अ‍ॅसिडगळती होत असल्याचे निदर्शनास आल्याने तत्काळ सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही.

Back to top button