मार्चमध्ये पुणे प्रथमच ठंडा ठंडा... कूल कूल..!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा मार्च महिन्यात शहराच्या हवामानाने अनेक विक्रम मोडीत काढले. पाऊस, कमाल व किमान तापमानात दरवर्षीच्या मार्चपेक्षा यंदाचा मार्च खूप वेगळा ठरला. शहराचे किमान तापमान तब्बल 26 दिवस 12.5 अंशांवर, तर कमाल तापमान 31 ते 35 अंशांवर होते. तसेच महिनाभरात एकदाही उष्णतेची लाट आली नाही.
यंदाचा फेब्रुवारी हा 122 वर्षांतील सर्वांत उष्ण ठरला. शहराचा पारा 40 अंशांवर गेल्याने मार्चमध्ये अंगाची लाही लाही होणार, असे वाटत होते. मात्र, अवघा मार्च प्रथमच ठंडा ठंडा… कूल कूल… ठरला; कारण या महिनाभरात उष्णतेची एकही लाट तीव्र ठरली नाही.
मागच्या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेच्या सलग दोन लाटा आल्या, तर एप्रिलमध्ये तीन लाटा आल्या होत्या. पुणे वेधशाळेचे मार्च महिन्यातील सर्व जुने ताळेबंद तपासले असता मार्च 2023 हा महिना सर्वांत थंड ठरला.
दरम्यान, आगामी पाच ते सहा दिवस शहरावर ढगांची छाया राहणार असून, कमाल तापमानातही फारशी वाढ होणार नाही. मार्च महिन्यात शहराचा पारा एकदाही चाळीशी पार गेला नाही तसेच वातावरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राहणार आहे. 1 ते 6 एप्रिलपर्यंत शहरावर ढग दाटून राहतील. त्यानंतर तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ होऊ शकते, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.
मार्च महिन्यातील रेकॉर्ड
कमाल तापमान ः 42.8 अंश (28 मार्च 1892)
किमान तापमान : 7.2 अंश (2 मार्च 1908)
महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान :
35.7 अंश
(29 मार्च 2023)
कमाल तापमान महिनाभर
33 ते 35 अंशांवर
एकही उष्णतेची लाट नाही
महिनाभरात 9.7 मिमी पावसाची नोंद
17 मार्च 2023 रोजी
4.2 मिमी सर्वाधिक पाऊस