पुणे: सेवानिवृत्त सुभेदाराला 1 कोटींचा गंडा, ऑनलाईन ‘टास्क पे’चे प्रलोभन पडले महागात | पुढारी

पुणे: सेवानिवृत्त सुभेदाराला 1 कोटींचा गंडा, ऑनलाईन 'टास्क पे'चे प्रलोभन पडले महागात

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ऑनलाईन टास्क पे च्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी सैन्य दलातून निवृत्त झालेल्या एका सुभेदारांना 1 कोटी दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रत्येक टास्कवर दहा ते वीस टक्के जादा पैसे देण्याचे प्रलोभन दाखवत ही फसवणूक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी, शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हडपसर येथील 60 वर्षीय निवृत्त सुभेदारांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 10 फेब्रुवारी 2023 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी मेसेजद्वारे सुभेदारांसोबत संपर्क साधला. त्यांना व्यवसाय करण्याचे आमिष दाखविण्यात आले. व्हिडीओला लाईक करण्याचा हा व्यवसाय होता. ठराविक टास्क देऊन प्रत्येक लाईकसाठी त्यांना काही पैसे मिळणार होते. सायबर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात खेचून लाईक केलेल्या व्हिडीओचे पैसे देखील दिले. सुभेदारांना विश्वास वाटला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना प्रिपेड स्किमध्ये सहभागी होऊन पैसे भरण्यास सांगितले. पैसे भरल्यास त्याच्या बदल्यात दहा ते वीस टक्के पैसे जास्त देण्याचे प्रलोभन दाखविले. त्यांच्याकडून तीन लाख, चार लाख, पाच लाख असे पन्नास लाख रुपये भरून घेतले.

टास्क पुर्ण केल्यानंतर त्यांना पैसे परत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पैसे परत मिळाले नाहीत. सुभेदारांनी पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांना वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. त्यानंतर सायबर ठगांनी दुसरा फंडा वापरत त्यांना पैसे प्रोसेसमध्ये आहेत. ते मिळविण्यासाठी विविध प्रक्रिया कराव्या लागतील. तसेच त्यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगितले. सुरुवातीला सुभेदारांनी मोठी रक्कम ठगांच्या हवाली केली होती. त्यामुळे ती परत मिळेल या कारणातून त्यांनी आणखी मोठी रक्कम त्यांच्या हवाली केली. तब्बल एक कोटी दहा लाख रुपये त्यांनी सायबर चोरट्यांना दिले. त्यासाठी घरातील इतर सदस्यांकडून त्यांनी पैसे घेतले. वाट पाहून देखील पैसे परत मिळत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पाच वेगवेगळ्या बँकामधील 12 खात्यामध्ये हे पैसे गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या वर्षात अशाप्रकारच्या दहा तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक सावंत करीत आहेत.

Back to top button