पुणे ते कन्याकुमारी प्रवास 24 तासांत; चिंचवडच्या विनील खारगेंची ‘धूम स्टाईल’ | पुढारी

पुणे ते कन्याकुमारी प्रवास 24 तासांत; चिंचवडच्या विनील खारगेंची ‘धूम स्टाईल’

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड येथील आयटी अभियंता असलेल्या 39 वर्षांच्या विनील खारगे याने 23 तास 57 मिनिटांत पुणे ते कन्याकुमारी पुन्हा पुणे असे तब्बल 3 हजार 48 किलोमीटर प्रवास दुचाकीवरून (स्पोर्ट्स बाईक) केला. त्याच्या या वायू वेगाच्या वाहन प्रवाशाची नोंद विक्रम म्हणून नोंदविली गेली आहे. त्याच्या या धाडसाचे शहराभरात कौतूक होत आहे.

विशेष केला सराव
विनील याला सुसाट वेगात बाईक चालविण्याचे वेड आहे. त्यासाठी तो हेल्मेटसह सर्व सुरक्षा साधनांचा वापर करतो हे विशेष. तसेच, वाहतुकीच्या नियमांचे पालनही करतो. त्याने देशाचे दक्षिणेकडील टोक असलेल्या कन्याकुमारीपर्यंत बाईकने वेगवान प्रवास करण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी विशेष सरावही केला.

विक्रमानंतर आनंदाश्रू
पुणे ते कन्याकुमारी प्रवासाला त्याने 24 फेब्रुवारीला सुरुवात केली. पुणे, हुबळी, सिरा, बंगळुरू, सेलम, कन्याकुमारी या मार्गे त्याची बाईक वार्‍याशी स्पर्धा करीत धावली. तेथे पोहोचल्यानंतर पुन्हा त्याच मार्गे तो सुसाट वेगाने पुण्यात परतला. या 3 हजार 48 किलोमीटर अंतरासाठी त्याला अवघे 23 तास 57 मिनिटांचा वेळ लागला. 24 तासाच्या आत हे अंतर पार केल्याने त्याने विक्रमाला गवसणी घातली आहे. विक्रम झाल्याने तो अक्षरश: ढसाढसा रडला.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
त्याच्या या वायू वेगातील बाईक प्रवासाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्याबद्दल त्याला प्रमाणपत्र व पदक देऊन नुकतेच गौरविण्यात आले. दरम्यान, यापूर्वी त्याने सन 2015 ला पुणे ते चेन्नई असा 2 हजार 137 किलोमीटर अंतर बाईकवरून 36 तासांत अंतर कापून विक्रम नोंदवला होता. बाईकवरून संपूर्ण भारतासह जगाची भ्रमंती करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद
आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे. अशक्य वाटणारा विक्रम माझ्या नावावर नोंदविला गेला आहे. आता संपूर्ण भारत देशासह जग भ्रमंती करण्याचा विचार आहे. त्यासाठी मोठा खर्च आहे. त्या दृष्टीने मी तयारी करणार आहे, असे बाईकस्वार विनील खारगे यांनी सांगितले.

Back to top button