पुणे-नाशिक हरित महामार्गासाठी सल्लागार कंपनी नियुक्त | पुढारी

पुणे-नाशिक हरित महामार्गासाठी सल्लागार कंपनी नियुक्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे-नाशिक हरित महामार्गाचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( एमएसआरडीसी) सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे पुणे- नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गापेक्षा हा महामार्ग पूर्णत: वेगळा आहे.

केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेमार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. या रेल्वे मार्गाची आखणी पूर्ण झाली असून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने त्यास मान्यता दिली आहे. तसेच या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम देखील सुरू झाले. अंतिम मान्यतेचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. या रेल्वे मार्गाला संलग्न पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा तांत्रिक आणि वित्तीय अहवाल तयार करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्ते महामंडळाला दिले होते. त्यावरून द्रुतगती रेल्वे की महामार्ग यावरून वाद सुरू झाला होता. मात्र, जानेवारी महिन्यात महारेल्वेच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी रेल्वे प्रकल्पाला गतीने मान्यता देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या वादावर पडदा पडला होता.

दरम्यान, पुणे- नाशिक हरित महामार्गाबाबत रस्ते महामंडळाने सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करून ती अंतिम टप्प्यात आहे. तसेच महामंडळाने या महामार्गाचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. या सल्लागार कंपनीकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

पुणे-नाशिक हरित महामार्गाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एका सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित कंपनीने काम सुरू केले आहे.
– राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, रस्ते महामंडळ

प्रकल्पाचा आढावा

पुणे-नाशिक हरित महामार्गाची लांबी 178 किलोमीटर असून, या प्रकल्पाकरिता भूसंपादनासह अपेक्षित खर्च 21 हजार 158 कोटी रुपये आहे. त्यासाठी साधारणत: 2000 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.

Back to top button