तळवडेकरांची पाण्यासाठी दोन किमीची पायपीट | पुढारी

तळवडेकरांची पाण्यासाठी दोन किमीची पायपीट

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा :  खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील तळवडे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांनी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. टँकर सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला आहे. श्री क्षेत्र कुंडेश्वर देवस्थान असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तळवडे गावची लोकसंख्या जवळपास 1 हजार आहे. गावच्या परिसरात दोन पाझर तलाव असून, पाण्यासाठी तीन विहिरी आहेत. गावासाठी झालेली नळ पाणीपुरवठा योजना देखील खूप वर्षांपूवीर्ची आहे. मुकाई पाझर तलावजवळच गावच्या सार्वजनिक पाण्यासाठीच्या तीन विहिरी असून, तलावातील पाणी आटल्याने विहिरी देखील आटू लागल्या आहेत.

त्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना गावठाणापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या मुकाई पाझर तलावाजवळच्या सार्वजनिक विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. दोन्ही ठाकरवाड्यांतील नागरिकांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने खेड पंचायत समितीकडे टँकर सुरू करावा म्हणून प्रस्ताव दिला आहे. प्रस्ताव देऊन महिना झाला, तरी देखील गावात अद्याप टँकर सुरू झालेला नाही. पाण्यासाठीची पायपीट थांबण्यासाठी टँकर लवकर सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
तळवडे गावासाठी जलजीवन मिशनमधून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. परंतु, अद्याप योजनेचे काम सुरू झालेले नाही.

Back to top button