गुटख्याची वाहतूक; दोन जणांना अटक

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : बंदी असलेला तब्बल 18 लाखांच्या अवैध गुटख्यासह 24 लाखांचा माल इंदापूर पोलिसांनी अकलूजकडून पुण्याच्या दिशेने वाहतूक करणार्या पिकअप गाडीवर कारवाई हस्तगत केला. याप्रकरणी कर्नाटक राज्यातील प्रकाश कुशान हेगरे (वय 26, रा. कोकटनुर, ता. अथनी, जि. बेळगाव) व मल्लु जयश्री मेलगडे (वय 18, रा. अर्जुनगी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) यांना इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे.
गुटखा वाहतूक करणारे पिकअप कर्नाटकहून अकलूज-इंदापूरमार्गे पुण्याच्या दिशेने निघाला होता. या वाहनात अवैध गुटखा असल्याची गोपनीय माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोलपंपाजवळ बुधवारी (दि. 29) रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पिकअप (एमएच 13 डीक्यू 2496) हा 6 लाख रुपये आणि गुटखा असा एकूण 24 लाख 8 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस नागनाथ पाटील योगेश लंगुटे, सुनील बालगुडे, विकास राखुंडे यांनी केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.