

पुणे शहर आणि उपनगरांत असलेल्या महापालिकेच्या 14 नाट्यगृहांपैकी कलाकारांची सर्वाधिक पसंती बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा मंच (स्वारगेट), लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह (बिबवेवाडी), यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (घोले रस्ता) या नाट्यगृहांनाच आहे. परंतु, उपनगरांतील नाट्यगृहांना अजूनही थंडच प्रतिसाद आहे. उन्हाळ्याच्या सीझनसाठी काही नाट्यगृहांच्या तारखांचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. परंतु, इतर नाट्यगृहांना थंड प्रतिसाद आहे.
नाट्यगृहांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव, वीज यंत्रणा बिघडली आहे, तर अनेक ठिकाणी एसी कार्यान्वित नाही. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नाट्यगृहांमध्येही अनेक समस्यांना कलाकारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी कलाकारांनी केली आहे.
या नाट्यगृहांची चलती!
मध्यवर्ती ठिकाणी असलेली नाट्यगृहे, पार्किंगच्या सुविधेमुळे बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा मंच, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन या नाट्यगृहांना सर्वाधिक प्रतिसाद आहे.
प्रतिसाद नसलेली उपनगरांतील नाट्यगृहे
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन (गंज पेठ), महात्मा फुले सांस्कृतिक भवन (वानवडी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (पुणे स्टेशन), मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (कोरेगाव पार्क), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कला रंगमंदिर (येरवडा), हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन (स्वारगेट), पंडित भीमसेन जोशी कलादालन (सहकारनगर), साहित्यसम—ाट विजय तेंडुलकर नाट्यगृह (सहकारनगर), पंडित भीमसेन जोशी कलामंदिर (औंध).
बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह आणि पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन या नाट्यगृहांच्या उन्हाळ्याच्या सीझनमधील एप्रिल आणि मेपर्यंतचे बुकिंग हाऊसफुल्ल आहे. परंतु, उपनगरातील नाट्यगृहांना कमी प्रतिसाद आहे. प्रतिसाद वाढावा, यासाठी आम्ही प्रयत्नही करीत आहोत. संयोजक संस्था आणि कलाकारांकडून प्रतिसाद मिळत नाही.
– विजय शिंदे, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर