पुणे: माऊलींच्या समाधीवर शिंदेशाही साज, चंदन उटीचा वापर करत साकारले महादजी शिंदे, श्रीराम नवमीची परंपरागत प्रथा | पुढारी

पुणे: माऊलींच्या समाधीवर शिंदेशाही साज, चंदन उटीचा वापर करत साकारले महादजी शिंदे, श्रीराम नवमीची परंपरागत प्रथा

आळंदी, पुढारी वृत्तसेवा: डोक्यावर शिंदेशाही पगडी, अंगात भरजरी सदरा, कंबरेला पिवळा पितांबर आणि चेहऱ्यावर पिळदार मिशी असा मराठमोळा शिंदेशाही साज देऊन रामनवमीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर मराठा साम्राज्याचे महान सेनानी महादजी शिंदे यांचे रूप साकारण्यात आले होते. आळंदी संस्थानचे वतीने ही प्रथा परंपरा जपली जात असून पुणे येथील शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी ही उटी साकारली.

यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पवमान अभिषेक व पूजा झाल्यानंतर दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संतोष मोझे यांच्या वतीने ह.भ.प. शरद महाराज बंड यांचे कीर्तन झाले. त्यानंतर राम जन्माचा पाळणा आणि आरती झाली. मानकऱ्यांना नारळ आणि प्रसाद वाटप करण्यात आले. भाविकांना खिरापत वाटण्यात आली. आवेकर भावे संस्थानच्या श्री रामचंद्र पालखीचे मंदिरात आगमन व पूजन झाले. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर भाविकांसाठी चंदन उटी दर्शन खुले करण्यात आले. शिंदेशाही अवतार पाहण्यासाठी माऊली भक्तांनी गर्दी केली हाेती. आळंदी परिसरात रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आली.

म्हणून साकारतात महादजी शिंदे उटी

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व पालखी सोहळ्यात महादजी शिंदे यांचे मोठे योगदान असून त्याकाळी संस्थानला शिंदे यांचा राजाश्रय लाभला होता. मंदिरातील विविध बांधकामे शिंदे यांनी बांधलेली असून त्यांचे योगदान अनन्य साधारण असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून रामनवमीला मंदिरात प्रथा-परंपरेनुसार त्यांचे चंदन उटीतून रूप साकारण्यात येते.

Back to top button