चिंता नसावी! मुद्रांक शुल्क भरल्यानंतर चार महिन्यांपर्यंत दस्तनोंदणी करणे शक्य | पुढारी

चिंता नसावी! मुद्रांक शुल्क भरल्यानंतर चार महिन्यांपर्यंत दस्तनोंदणी करणे शक्य

पुणे, पुढारी वृत्तसेवा: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून 1 एप्रिल रोजी नवे चालू बाजारमूल्य दर (रेडिरेकनर) लागू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये रेडिरेकनर दरांत वाढ प्रस्तावित करण्यात आल्याची चर्चा असल्याने सध्या राज्यभरात नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे. मात्र, नोंदणी अधिनियम 1908 च्या कलम 23 नुसार मुद्रांक शुल्क भरलेल्या दिवसापासून पुढील चार महिन्यांत केव्हाही दस्त नोंदविता येतो. त्यानुसार नागरिकांनी मुद्रांक शुल्क भरून पुढील चार महिन्यांत दस्त नोंदणी करावी, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

करोना संकटामुळे सन 2020 मध्ये 1 एप्रिल रोजी रेडिरेकनरचे दर जाहीर करण्यात आले नव्हते. त्यापूर्वी दोन वर्षे रेडिरेकनर दरात वाढ करण्यात आली नव्हती. करोनामुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत असल्याने सप्टेंबर 2020 मध्ये काही प्रमाणात दरांत वाढ करण्यात आली होती. तसेच रेडिरेकनर दर वाढविल्यानंतर केवळ सहाच महिने झालेले असल्याने सन 2021 मध्ये दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते, तर गेल्या वर्षी सन 2022 मध्ये रेडिरेकनर दरांत वाढ करण्यात आली होती. पुढील वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका असल्याने रेडिरेकनदर दरांत वाढ होण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा रेडिरेकनर दरांत वाढीची दाट शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांत मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. चालू महिन्यात 14 ते 20 मार्च सलग सात दिवस शासकीय कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे दस्त नोंदणी पूर्ण क्षमतेने होऊ शकलेली नाही. त्यामुळे सध्या दस्त नोंदणीसाठी दरवर्षीपेक्षा थोडी जास्त गर्दी होत आहे. त्यामुळे नोंदणी अधिनियम 1908 च्या कलम 23 नुसार मुद्रांक शुल्क भरलेल्या दिवसापासून पुढील चार महिन्यांत केव्हाही दस्त नोंदविता येतो. त्यानुसार 31 मार्चपूर्वी मुद्रांक शुल्क भरणार्‍या नागरिकांना 31 जुलैपर्यंत दस्त नोंदणी सध्याच्या रेडिरेकनरनुसार करता येणार आहे.

Back to top button