पुणे: मॉडेल कॉलनीतील ज्येष्ठाची सेक्सटॉर्शनद्वारे फसवणूक | पुढारी

पुणे: मॉडेल कॉलनीतील ज्येष्ठाची सेक्सटॉर्शनद्वारे फसवणूक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मॉडेल कॉलनीतील एका ज्येष्ठ नागरिकाला सेक्सटॉर्शनमधून 4 लाख 66 हजार रुपयांना लुबाडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी 64 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉटसअ‍ॅपवर चॅटिंग करत लैंगिक भावना उत्तेजित करुन न्यूड होण्यास भाग पडले. नंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ही फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 21 ते 25 मार्च दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका कंपनीतून निवृत्त झाले आहेत. ते घरी असताना त्यांना एका दिवशी व्हॉटसअ‍ॅपवर कॉल आला. त्यांच्याशी एका तरुणीने चॅटिंग व व्हिडिओ कॉल करुन त्यांच्या लैगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडिओ दाखविला. त्यांना न्यूड होण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचा हा व्हिडिओ कॉल स्क्रीन रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांना हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे त्यांनी घाबरुन ती सांगेल तसे पैसे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सायबर सेल दिल्ली क्राईम ब्रँचमधून राम पांड्ये बोलत असल्याचे सांगून तुमचा व्हिडिओ युट्युबवर अपलोड होणार आहे. तसेच पायल शर्मा हिने तक्रार दिल्याचे सांगितले. त्यानंतर युट्युब प्रतिनिधीशी बोला असे सांगून संजय सिंग नाव सांगणाऱ्याचा नंबर दिला. त्याने व्हिडिओ डिलिट करण्यासाठी दीड लाखांची मागणी केली. त्यांनी पैसे दिल्यावर आता तुमची केस मुंबई सायबर सेलला पाठविणार असल्याची भिती दाखवून त्यांच्याकडे 5 लाखांची मागणी केली. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक चिंतामण तपास करीत आहेत.

राजस्थानमधील सेक्सटॉर्शन टोळ्यांचा फंडा

दरम्यान सेक्सटॉर्शन प्रकरणात पुण्यातील दोघा तरुणांनी आत्महत्या केली होती. पुणे पोलिसांनी राजस्थानमधील दोन टोळ्यांना अटक केली होती. राजस्थानमधील गुरुगोठिया गाव परिसरातील टोळ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले होते. या टोळ्यांनी देशभरात गुन्हे करुन नागरिकांकडून खंडणी उकळली होती. गेल्या वर्षभरापासून शहरात सेक्सटॉर्शन प्रकार वाढीस लागले आहेत. जेष्ठ नागरिक देखील त्यामध्ये अडकत आहेत.

Back to top button