ज्वारी, बाजरीने गाठली ‘साठी’; सामान्यांच्या तोंडचा घास पळविला

पिंपळे गुरव; पुढारी वृत्तसेवा : गरिबांच्या ताटातील भाकरीच्या ज्वारीचे भाव सध्या पन्नाशी पार करत आहेत. रोजंदारीवर काम करणार्याला सध्या ज्वारी आणि बाजरीची भाकरी रोजच्या ताटात परवडणारी ठरत नसल्याचे निराशादायी चित्र सध्या दिसत आहे. पूर्वी बाजारपेठेत अठ्ठावीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे ज्वारी मिळायची. परंतु गेल्या महिन्याभरापासून ज्वारीचे भाव साठ तर बाजरीही पन्नास रुपये किलोभावाने दरात मिळत आहे. बाजारात बाजारीने देखील किलोच्या भावात पन्नाशीचा टप्पा गाठल्याचे दिसून येत आहे.
नोकरदार मंडळींसाठी मेस, भाजी पोळी केंद्रावरदेखील दहा रुपयाला मिळणारी भाकरी आता वीस रुपयात मिळत आहे. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारी परवडण्यासारखी राहिली नाही. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे शेतीतील पिके वाहून गेल्याने त्याचा फटका शेतकर्याला बसला. त्यातून शहर भागातील बाजार पेठांमध्ये ज्वारी आणि बाजरीला भाव वाढल्याचे दिसून येत आहे.
आता मजुरीवर काम करणार्या वर्गाला भाकरी परवडण्यासारखी राहिली नाही. मजूर अड्ड्यावर रोजची कामं मिळण्यासाठी धावपळ सुरू असते. त्यातून जगण्यासाठी लागणार्या झुणक्याबरोबर ज्वारीचा भाव वाढल्याने रोजच्या जगण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागणार हे नक्की.
ज्वारी आणि बाजरीत भाववाढ झाल्याने विकत घेण्याकडे गिर्हाईकांचा कल कमी दिसत आहे. अवकाळी पावसाचा फटका शेतकर्यांबरोबर दुकानदारांनाही यावेळी बसला आहे.
– दुकान विक्रेता, नवी सांगवी
रोजंदारीवर काम करणार्या वर्गाला भाववाढ झाल्याने एक वेळ जेवण अगर उपासमारीची वेळ येते. रोजच्या जेवणात कामगार भाकरी, चटणी खातो. परंतु ज्वारी आणि बाजरीच्या भाववाढीमुळे गरिबाच्या तोंडचा घास पळवला आहे.
– सविता पवार, घर कामगार, पिंपळे गुरव