केंद्र, राज्य सरकारकडून शेतकर्‍यांची फसवणूक | पुढारी

केंद्र, राज्य सरकारकडून शेतकर्‍यांची फसवणूक

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांना 3 लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज वाटप करण्याचे केंद्र व राज्य सरकारने धोरण आहे; परंतु अचानक मार्च 2022 अखेरीस केंद्र व राज्य शासनाने त्यांच्याकडील प्रत्येकी 3 टक्के अशी 6 टक्के रक्कम व्याजापोटी देण्याचे थांबविल्याने बँका आणि सोसायट्यांनी मुद्दलासह हे 6 टक्के वसूल केले आहेत. गेल्या वर्षीची व्याजाची रक्कम एक वर्ष उलटूनही अद्यापही शेतकर्‍यांना राज्य व केंद्र सरकारकडून परत मिळालेली नाही, उलट यावर्षी पुन्हा हे सहा टक्के वसूल केले जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.

शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी व्याजाचे पैसे मिळविण्यासाठी वारंवार सोसायट्यांमध्ये हेलपाटे मारून विचारणा करत आहेत, आता व्याजासहीत पीककर्ज भरावे लागत असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. यापूर्वी राज्य सरकार व केंद्र सरकार आधीच व्याज भरत होते; परंतु आता त्यांनी व्याज न भरल्यामुळे शेतकर्‍यांकडून गेल्या मार्च अखेरीस व आत्ताच्या मार्चअखेरपर्यंत पीककर्जाच्या मुद्दलाच्या 6 टक्के व्याजासह रक्कम तालुक्यातील विविध विकास कार्यकारी संस्थांनी वसूल करण्यास सुरुवात केली आहे.

शेतकर्‍यांनी उधार-उसनवार करून पीककर्ज वेळेत भरले आहे, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच वेळेत राज्य व केंद्र सरकारने व्याज भरून शेतकर्‍यांची हेळसांड थांबवावी; अन्यथा सरकारला शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
                                   – संजय पोखरकर, माजी सरपंच, वडगावपीर

Back to top button