बारामती : प्लास्टिक पिशव्यांच्या कारवाईत सातत्य हवे | पुढारी

बारामती : प्लास्टिक पिशव्यांच्या कारवाईत सातत्य हवे

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बारामती नगरपालिकेने कागदी, कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन करूनही शहर आणि परिसरात नागरिक प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करत असल्याचे चित्र आहे. प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी असतानाही शहरातील बहुतांश व्यावसायिक अजूनही कॅरीबॅगचा वापर करीत आहेत. यापूर्वी पालिका कॅरीबॅग वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करीत होती. मात्र, पालिका कर्मचार्‍यांना घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे काम वाढल्याने दंडात्मक कारवाई थंडावली आहे. राज्य सरकारने प्लास्टिक कॅरीबॅगसह थर्माकोल व प्लास्टिक ताट, वाटी, चमचे आदींसह तत्सम वस्तूंवर बंदी आणली. पर्यावरणरक्षण हा त्याच्यामागील उद्देश होता. मात्र, बारामतीत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे नगरपालिका प्रशासन, अधिकारी व कर्मचारी प्लास्टिक वापरू नका, असे सांगत असताना काहीजण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

स्थानिक व्यावसायिक ग्राहकांना प्लास्टिक कॅरीबॅग देत नाहीत. मात्र, भाजीमंडई परिसरातील छोटे- मोठे व्यावसायिक आणि फळविक्रेते मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगचा वापर करीत आहेत. यामुळे सर्वांना सारखेच नियम करावेत, अशी मागणी व्यावसायिक करीत आहेत. तर काहीजण छुप्या पद्धतीने कॅरीबॅग देत 5 रुपये आकारत आहेत. शहरातील सुज्ञ नागरिक कापडी पिशव्यांचा वापर करत पर्यावरणरक्षणाचे काम करीत असताना अन्य नागरिकांकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांनी प्लास्टिकमुक्त बारामतीसाठी पालिकेने दिलेल्या सूचना पाळून सहकार्य करण्याची गरज आहे.

पालिका प्रशासनाने अशा व्यवसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. बारामती शहर नगरपालिकेकडून प्लास्टिकमुक्तीसाठी उपक्रम राबविले जात आहेत. शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त पालिकेची नसून नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. वारंवार जनजागृती करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने थेट कारवाई करण्याची गरज यानिमित्ताने होत आहे.

Back to top button