ऊसतोडणी कामगार परतीच्या प्रवासाला | पुढारी

ऊसतोडणी कामगार परतीच्या प्रवासाला

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा :  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची मंगळवारी (दि. 28) सांगता झाल्याने तोडणी कामगार आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून कारखाना परिसरात राहणार्‍या ऊसतोडणी कामगारांची घरी जाण्यासाठी लगबग सुरू आहे. प्रथमच मार्च महिन्यात हंगाम बंद झाल्याने पुढील दोन-अडीच महिने कसे काढायचे? असा प्रश्न ऊसतोड कामगारांना सतावत आहे. मुकादमाकडून घेतलेली उचलही फिटली नसल्याने तसेच गावाकडील दुष्काळी परिस्थिती, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न, जनावरे विकण्याची आलेली नामुष्की, यामुळे ऊसतोड कामगारांची जगण्यासाठी धडपड सुरू राहणार आहे.

दुष्काळी परिस्थिती, गावाकडे रोजगार नसणे, यामुळे शेकडोपेक्षा अधिक ऊसतोडणी कामगार कारखाना परिसरातच मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात, तर काही जणांचे या परिसरातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने ते याच परिसरात स्थायिक झाले आहेत. उर्वरित कामगार आपले संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य, जनावरे आदी साहित्य वाहनांत भरून गावी जाण्याची तयारी करीत आहेत. कुटुंबातील अन्य सदस्य साहित्य बांधत आहेत, तर काही जण त्यांना मदत करीत आहेत. दरम्यान, बागायती पट्ट्यातील शेतकर्‍यांकडे काम मिळत असल्याने अनेक जण पुढील हंगामापर्यंत याच ठिकाणी स्थायिक होतात. हंगाम बंद झाल्याने येत्या दोन दिवसांत परिसर ओस पडणार आहे.

मुकादमाकडून घेतलेली उचल फिटली नसल्याने आर्थिक ताण जाणवणार आहे. पाऊस होईपर्यंत
अडीच महिने जनावरे जगविण्यासाठी तसेच माणसांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. हंगाम उशिरापर्यंत चालला असता तर दिलासा मिळाला असता.
                       -कमलबाई फाळके व उषाबाई काशीद, ऊसतोड महिला कामगार

Back to top button