देवदर्शनाला गेलेल्यांच्या घरात सहा लाखांची चोरी ; बारामतीच्या म्हाडा कॉलनीतील घटना | पुढारी

देवदर्शनाला गेलेल्यांच्या घरात सहा लाखांची चोरी ; बारामतीच्या म्हाडा कॉलनीतील घटना

बारामती : पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर, अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेलेल्या शिक्षकाचे घर फोडत सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा 5 लाख 91 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळविला. बारामती शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. विनायक सुरेश राऊत (रा. म्हाडा कालॅनी, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. राऊत हे शारदाबाई पवार विद्यानिकेतन येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दि. 25 रोजी ते कुटुंबासह तुळजापूर, अक्कलकोट येथे देवदर्शनाला गेले होते.

पत्नीला दागिने घ्यायचे असल्याने त्यांनी घरात 3 लाख 70 हजार रुपये साठवून ठेवले होते. ही रक्कम व सोन्याचे दागिने त्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवत ते लॉक केले. दि. 25 रोजी त्यांनी अक्कलकोट येथे मुक्काम केला. दि. 26 रोजी त्यांचे मेहुणे अमृत पानसांडे यांनी घरामध्ये चोरी झाल्याची माहिती त्यांना दिली. अक्कलकोटहून तातडीने निघत राऊत यांनी बारामती गाठली. घरामध्ये पाहणी केली असता 3 लाख 70 हजार रुपयांची रक्कम, याशिवाय 32 हजार रुपयांची सोन्याची साखळी, एक लाखाचे गंठण, 60 हजारांचे मिनी गंठण, प्रत्येकी चार हजार रुपयांचे कानातले दागिने, 20 हजार रुपयांचे कानातले दागिने व इतर अशा 5 लाख 91 हजारांच्या दागिने व रोख रकमेवर अज्ञाताने डल्ला मारल्याचे त्यांना दिसून आले.

Back to top button