सेझमधून खेड, शिरूर तालुक्यांतील जमिनी वगळल्या ; माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती | पुढारी

सेझमधून खेड, शिरूर तालुक्यांतील जमिनी वगळल्या ; माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : खेड विशेष आर्थिक क्षेत्र टप्पा 2 मधील पूर, चौधरवाडी, गोसाशी, वाफगाव, पाबळ, रेटवडी आणि वरुडे या गावांतील एकूण 2579.89 हेक्टर क्षेत्र वगळण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. खेड सेझकरिता खेड व शिरूर तालुक्यांतील हजारो एकर जमिनीवर संपादनाचे शिक्के टाकण्यात आले होते. मात्र, तत्कालीन शासनाने जाहीर केलेला मोबदला अतिशय तुटपुंजा असल्याने जमिनीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकर्‍यांना मिळावा अथवा जमिनीवरील सेझचे शिक्के काढण्यात यावेत, यासाठी आढळराव पाटील यांचा शासनदरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता.

त्यांच्या आग्रही मागणीवरून 13 सप्टेंबर 2022 रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्यासह बाधित गावांतील शेतकर्‍यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने सेझचे शिक्के काढण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

यानंतर या कामाला वेग येऊन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने एमआयडीसी भूसंपादनाचे महाव्यवस्थापक यांनी 9 फेब्रुवारी 2023 रोजी राज्याचे उद्योग विभागाचे अवर सचिव यांना संबंधित क्षेत्र विनाअधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला. त्यास महाराष्ट्र शासनाचे सहसचिव यांनी मंजुरी देत 16 जुलै 2006 व 17 एप्रिल 2010 रोजी खेड सेझसाठी अधिसूचित केलेले 2579.89 हेक्टर क्षेत्र विनाअधिसूचित करण्यास शासनमान्यता दिल्याचे आदेश निर्गमित केले आहे. यामध्ये पूर 42.73 हेक्टर, चौधरवाडी 173.18 हेक्टर, गोसाशी 228.95 हेक्टर, वाफगाव 389.68 हेक्टर, पाबळ 559.31 हेक्टर, रेटवडी 579.01 हेक्टर, वरुडे 607.03 हेक्टर असे एकूण 2579.89 हेक्टर क्षेत्र वगळण्यात
येणार आहे.

Back to top button