बारामती : भावाचाच धाकट्यावर प्राणघातक हल्ला | पुढारी

बारामती : भावाचाच धाकट्यावर प्राणघातक हल्ला

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  घरासमोरून ट्रॅक्टर न्यायचा नाही, असे म्हणत मोठा भाऊ व त्याच्या कुटुंबातील इतरांनी छोटा भाऊ व इतरांवर प्राणघातक हल्ला केला. कारखेल (ता. बारामती) येथे ही घटना घडली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कविता अण्णा शिंदे (रा. शिंदेवस्ती, कारखेल) यांनी फिर्याद दिली आहे. अण्णा शिंदे व त्यांची पुतणी निशा भारत शिंदे हे दोघे घटनेत गंभीर जखमी झाले. पोलिसांनी अशोक शंकर शिंदे, दीपक अशोक शिंदे, अमित अशोक शिंदे, जयश्री अशोक शिंदे, मोनाली दीपक शिंदे व वर्षा अमित शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

रविवारी (दि. 26) रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. अशोक शिंदे यांच्या घरासमोरून अण्णा शिंदे हे ट्रॅक्टरमधून मका नेत असताना अशोक शिंदे यांनी या रस्त्याने जायचे नाही, असे सांगितले. रस्ता वडिलोपार्जित आहे, असे अण्णा शिंदे यांनी म्हणताच अशोक, दीपक, अमित हे हत्यारांसह अंगावर धावून आले. त्यासोबत जयश्री, मोनाली, वर्षा हेही आले. अण्णा शिंदे यांच्याबरोबर फिर्यादी व पुतणी निशा यांना सर्वांनी मारहाण सुरू केली. मारहाणीत अण्णांच्या डोक्यात रॉड लागून रक्त आल्याने ते जागीच कोसळले. फिर्यादीला व निशा यांनाही बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत अण्णा शिंदे यांना उपचारांसाठी बारामतीत दाखल करण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button