पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी | पुढारी

पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

मंचर : पुढारी वृत्तसेवा : बाजारात द्राक्ष विक्री करून पतीसोबत दुचाकीवरून घरी परतणार्‍या महिलेवर रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविला. ही घटना लौकी (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (दि. 28) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली.
जयश्री धोंडीबा भालेकर (रा. मांजरवाडी, ता. आंबेगाव) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. जयश्री भालेकर ह्या त्यांचे पती धोंडीबा बाळू भालेकर यांच्यासोबत मंगळवारी कळंबच्या बाजारात द्राक्षे विकून रात्री घरी परतत होत्या.

सव्वादहा वाजण्याच्या सुमारास लौकी गावच्या वेशीजवळ त्यांची दुचाकी आली असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप मारली. यामध्ये बिबट्याचा पंजा जयश्री यांच्या गुडघ्यावर बसला व दुचाकीवरून खाली पडून त्या जखमी झाल्या. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नीलेश थोरात यांनी पोपट पोखरकर यांच्या वाहनातून जखमी जयश्री यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ग्रामपंचायत सदस्य जालिंदर थोरात, प्रतीक थिटे यांच्यासह स्थानिक महिला व तरुण यांनी याकामी मदत केली. दरम्यान, मंचर रुग्णालयात लस उपलब्ध न झाल्याने त्यांना जुन्नर येथे उपचारांसाठी पाठविण्यात आले.

बिबट्यांना लवकरात लवकर जेरबंद करा
लौकी येथील राणूबाई मंदिराजवळ मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर वाढला आहे. लौकीसह चांडोली परिसरात शशिकांत पडवळ, प्रतीक थिटे, सुदाम काळे, महेश थोरात हे बिबट्याच्या हल्ल्यांत जखमी झाले आहेत. त्यामुळे बिबट्यांची मोठी दहशत पसरली आहे. बिबट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी सरपंच एकता थोरात, उपसरपंच विनोद थोरात, माजी सरपंच संदेश थोरात, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर थोरात यांच्यासह शेतकरी बांधवांनी केली आहे.

शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करा
बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक असणारी लस मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाही. ती तातडीने उपलब्ध करावी. बिबट्यांच्या भीतीने शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री शेतात पाणी भरता येत नाही. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नीलेश थोरात यांनी केली आहे.

पिंपळगावात बिबट्यांकडून मेंढी फस्त

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील लिंबाचा मळा येथे दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात मेंढीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 29) रात्री घडली. पिंपळगाव खडकी येथे लिंबाच्या मळ्यात शेतकरी बाळकृष्ण बांगर यांच्या शेतात मेंढपाळ दारकू बास्कर यांच्या मेंढ्यांचा वाडा बसला होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन बिबट्यांनी या वाड्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एक मेंढी बिबट्यांनी ठार केली. अचानक झालेल्या हल्ल्याने सर्व मेंढ्या सैरावैरा पळत सुटल्या. त्यामुळे मेंढपाळामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्या परत येईल, या भीतीने मेंढपाळांनी ठार झालेली मेंढी लांब नेऊन टाकली. बिबट्याने ती लांब ओढून नेत तिचा फडशा पाडला. या घटनेचा वन विभागाने पंचनामा केला आहे. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मेंढपाळांनी केली आहे.

 

Back to top button