पिंपरी : शहरात भाजपतर्फे सावरकर गौरव यात्रा | पुढारी

पिंपरी : शहरात भाजपतर्फे सावरकर गौरव यात्रा

पिंपरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदारसंघात 2 एप्रिल रोजी ’सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून सध्या सोशल मीडियावर ‘मी सावरकर’, ‘आम्ही सारे सावरकर’ ही मोहीम राबविली जात आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान करणार्‍या राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्यासाठी भाजप-शिवसेना राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढत आहे. त्याच पद्धतीने पिंपरी-चिंचवडमध्ये काढण्यात येणार्‍या सावरकर गौरव यात्रेमध्ये खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

‘आम्ही सारे सावरकर’ मोहीम स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्याद्वारे अवमान केल्याच्या मुद्दयावरून भाजप आणि शिवसेना पदाधिकार्‍यांनी सोशल मीडियावर सध्या ‘आम्ही सारे सावरकर’ ही मोहीम राबविली आहे. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अश्विनी जगताप, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपचे शहर सरचिटणीस अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे, यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलमध्ये ’आम्ही सारे सावरकर’, ’मी सावरकर’ असा प्रोफाईल पिक्चर ठेवला आहे. तर, काही नेत्यांनी त्याचे फ्लेक्सदेखील लावले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या मुद्यावरून महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ’आम्ही सारे सावरकर’ ही मोहीम राबविली आहे. राज्यातील सर्व मंत्री आणि नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलमध्ये ‘आम्ही सारे सावरकर’ असा प्रोफाईल पिक्चर ठेवला आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढून सावरकरांच्या त्यागाची माहिती जनतेपर्यंत पोचविली जाईल.

                                                           – महेश लांडगे, आमदार

Back to top button