पुण्यात भरदिवसा 47 लाखांची रोकड लुटणारे त्रिकूट जेरबंद; समर्थ पोलिस, गुन्हे शाखेची कारवाई | पुढारी

पुण्यात भरदिवसा 47 लाखांची रोकड लुटणारे त्रिकूट जेरबंद; समर्थ पोलिस, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहराच्या मध्यवस्तीतून भरदिवसा व्यवसायिकाच्या नोकराकडील 47 लाखांची रोकड लुटून फरार झालेल्या तिघांना समर्थ पोलिस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 30 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

ऋषीकेश मोहन गायकवाड (वय 28, रा. बिबवेवाडी) याला अटक केली. गायकवाड हा यातील मुख्यसुत्रधार आहे. त्यानेच लुटीची ही योजना आखली होती. तर, किरण अशोक पवार व आकाश कपील गोरड (रा. बिबवेवाडी) या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. या दोघांनी प्रत्यक्ष नोकराकडील रोकड ठेवलेली पिशवी कोयत्याच्या धाकाने पळवली होती.

मंगलपुरी गोस्वामी (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गेल्या आठवड्यात (गुरूवारी) नाना पेठेतील आझाद चौकात आरोपींनी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही रोकड लुटली होती. मंगलपुरी हे दुचाकीवरून बँकेत रोकड भरण्यासाठी निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली होती.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील पवार, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे, शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, सौरभ माने,सौरभ थोरवे कर्मचारी जितु पवार, मयुर भोसले,महेश बामुगडे, निलेश साबळे, अय्याज दड्डीकर, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर यांच्या पथकाने केली.

असा लागला छडा..

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यांना संशयित रिक्षा या परिसरात फिरताना दिसली. चार दिवसांपासून ही रिक्षा पन्ना एजन्सीच्या कार्यालयाजवळ फिरत होती. तो ऋषीकेश गायकवाड असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा तो याचा मास्टरमाईंड निघाला. त्याच्या चौकशीत त्याने इतर दोघांची नावे सांगितली.

तर समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला प्रत्यक्षात लुटमार करणारे किरण पवार व कपील गोरड यांची माहिती मिळाली. त्यानूसार, त्यांना वेगवेगळ्या भागातून पकडले. त्यांच्याकडे सखोल तपास केला जात असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रोकड याची माहिती घेतली जात आहे.

सेल्समन ते लुटीचा मुख्यसुत्रधार

2019 ते ऑक्टोबर 2022 मध्ये ऋषीकेश हा एका कंपनीमार्फत पन्ना एजन्सीत सिगारेट सेल्समन म्हणून नोकरीला होता. त्याने भांडण केल्याने त्याला नोकरीवरून काढले होते. त्याला एजन्सीबाबत सर्व माहिती होती. एजन्सीची रोकड कधी बँकेत भरणा केली जाते, रोकड किती असते, ही रोकड घेऊन कोण जाते याची माहिती होती. तर त्याचे इतर दोघे साथीदार रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुद्ध बिबवेवाडी व भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

रेकी अन् लुट

किरण व आकाश पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर ऋषीकेश आणि इतर दोघे एकाच परिसरातील राहणारे आहेत. ऋषीकेशने त्यांना पैशाचे आमिष दाखवून लुटीची योजना सांगितली. त्यानुसार त्यांनी कट रचला. घटनेपुर्वी तिघे रिक्षाने आठ दिवस परिसरात फिरले. त्यांनी संपुर्ण परिसर पाहिला. पळून जाण्यासाठी सीसीटीव्ही नसणार्‍या रस्त्यांची निवड केली.

गुंगारा देण्यासाठी सीसीटीव्हीचा बहाणा

ऋषीकेशने दोघांना रोकड घेऊन जाणारा व्यक्ती दाखविल्यानंतर तो रिक्षाने थेट घरी गेला. रिक्षा पार्क केली. त्यानंतर तो या लुटीत सहभागी नसल्याचे दाखविण्यासाठी दिवसभर घरात लावलेल्या सीसीटीव्हीच्या खाली बसून होता. रात्री तो घराच्या बाहेर पडला. मात्र पोलिसांच्या नजरेतून सुटू शकला नाही.

Back to top button