शेकडो एकरावरील कांदापात करपली | पुढारी

शेकडो एकरावरील कांदापात करपली

महाळुंगे पडवळ : पुढारी वृत्तसेवा : हवामानातील बदलामुळे आंबेगाव तालुक्यात शेकडो एकरावरील कांदा करपला आहे. यामुळे
उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची चिन्हे आहेत. आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील साकोरे, महाळुंगे पडवळ, चास, नारोडी, कळंब, गिरवली आदी गावांमध्ये रब्बी व उन्हाळी हंगामातील कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये बारामाही पाणी उपलब्ध असल्याने नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा लागवड करतात.

यंदा कांदारोपे तयार होण्यास उशीर लागला. परिणामी, जानेवारी महिन्यात लागवडी झाल्या. त्यानंतर अवकाळी पाऊस, वातावरणातील सातत्याने होणारे बदल, यामुळे मागील आठवड्यात शेकडो एकरावरील कांदापात करपली आहे. पात करपल्याने कांद्याच्या फुगवण क्षमतेवर परिणाम होणार आहे. परिणामी, उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट येण्याची शक्यता आहे.

आंबा उत्पादनात घट होणार

या वर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे पिके व फळ झाडांवर विपरीत परिणाम झाला आहे. हिवाळा काळात योग्य थंडी पडली नाही व त्यात ढगाळ हवामान यामुळे आंबा मोहराची गळ जास्त प्रमाणात झाली आहे.
या वर्षी गावरान व संकरित आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात आले आहे. आंब्याला मोहर लागणे, फूल कळीतून लहान आंबा लागणे यावर परिणाम झाला आहे. मागील वर्षीपेक्षा निम्म्याने उत्पादन होण्याची शक्यता आहे. संकरित झाडांना 50 ते 70 मध्यम आकाराचे आंबे दिसत आहेत.

Back to top button