देहूगाव : अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे देहू नगरपंचायतीची दमछाक | पुढारी

देहूगाव : अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे देहू नगरपंचायतीची दमछाक

देहूगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयात 75 हजार रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा राज्य शासनाने केली. मात्र, ही घोषणा आताही कागदावरच आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होताना दिसत आहे. देहू नगरपंचायतीची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली. नगरपंचायतीचा आकृतीबंध मंजूर झाला असला तरी पदभरती होत नसल्याने सध्या अपुर्‍या कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढला आहे.

एकापेक्षा जास्त जबाबदारी सांभाळताना मुख्याधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची दमछाक होत आहे. देहूत सध्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांवरच नगरपंचायतीचा कारभार सुरू आहे. त्याचा विकासकामांवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी मुख्याधिकारी जनतेच्या प्रलंबित समस्या आणि तक्रारींचा निपटारा करण्यावर स्वतः लक्ष देत आहेत.आकृतीबंधानुसार पदभरती गरजेची दोन वर्षांपूर्वी देहू नगरपंचायतीची स्थापना झाली. तेव्हापासून ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांवरचा सर्व कारभार सुरू आहे.  सध्या कार्यरत मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्याकडे विविध पदांचा अतिरिक्त भार आहे. प्रशासकीय कारभार, हरकतीवरील सुनावण्या, शासकीय बैठका, यात्रा काळातील नियोजन आणि नागरिकांचे प्रश्न सोडविताना त्यांच्यावर मोठा ताण येत आहे. काही दिवसांपूर्वी संघपाल बनसोडे हे बांधकाम अभियंता रूजू झाल्याने त्यांना थोडा आधार मिळाला होता. मात्र, मंजूर आकृतीबंधानुसार पदभरती होणे अत्यंत गरजेचे आहे.देहू नगरपंचायतीस 7 लिपिक टंकलेख, 1 गाळणी चालक/प्रयोगशाळा सहायक, 3 पंप ऑपरेटर/वीजतंत्र/जोडारी, 1 तारतंत्री/वायरमन, 3 शिपाई, 2 मुकादम, 1 व्हॉल्व्हमन अशा 18 कर्मचार्‍यांची गरज असून, सध्या देहूनगर पंचायतीकडे फक्त 6 कर्मचारी उपलब्ध आहेत.

कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत :
8 पदाधिकारी आणि 12 कर्मचारी कमी असल्याने सध्या देहुनगर पंचायतीचे डॉ. प्रशांत जाधव आणि बांधकाम विभाग अभियंता संघपाल गायकवाड हे दोघेच देहुनगर पंचायतीचा गाडा ओढत आहेत. आपुर्‍या पदाधिकारी आणि कर्मचारी संख्येमुळे हा नगरपंचायतीचा डोलारा सांभाळताना मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

यात्रेत नगरपंचायतीची कसोटी : 
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, तुकाराम बीज व अन्य यात्रा उत्सवाच्या नियोजनात नगरपंचायतीवर प्रचंड ताण येतो. पूर्वी ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषदेची यंत्रणा मदतीला असायची. मात्र, आता यात्रा उत्सवात नगरपंचायतीला सर्व नियोजन आणि व्यवस्था पाहावी लागते.

सर्वच विभागाचे कर्मचारी तणावाखाली :
कामाच्या अतिरिक्त तणावामुळे अनेक कर्मचारी रक्तदाब, मधुमेहासारख्या आजाराने ग्रस्त आहेत. प्रभागांमधील विविध भागातील स्वच्छतेसाठी सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, काही भागात सफाई कर्मचार्‍यांची संख्याच अपुरी आहे. त्यामुळे सांडपाणी वाहिन्यांची नियमित सफाई होत नाही. स्थापत्य, आरोग्य अशा विविध विभागांच्या कामावर परिणाम होत आहे. देहूचा विकास गतिमान होण्यासाठी पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने  मिळणे गरजेचे आहे. कारण देहूची लोकसंख्या जवळपास 50 हजारांवर पोहोचली आहे. नागरिकरणाचा वेग वाढला आहे. शिवाय भाविकांची बाराही महिने वर्दळ असते. त्याचा मोठा ताण नगरपंचायत प्रशासनावर  येत आहे.

Back to top button