पिंपरी : ‘एच 3 एन 2’ ने 80 वर्षीय वृद्धेचा मृत्यू | पुढारी

पिंपरी : ‘एच 3 एन 2’ ने 80 वर्षीय वृद्धेचा मृत्यू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : इन्फ्ल्युएंझा ए – एच 3 एन 2 या आजाराचा संसर्ग झालेल्या 80 वर्षीय महिलेचा सोमवारी (दि.27) मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या पिंपरी- संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. संबंधित महिलेला उच्च रक्तदाब, हृदयाचा आजार, न्युमोनिया, रक्ताक्षय असे विविध आजारदेखील होते. त्यामुळे एच 3 एन 2 हे केवळ प्रासंगिक निदान असल्याचे आढळले आहे, अशी माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

संबंधित महिलेला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 20 तारखेला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते. तत्पूर्वी तिच्यावर पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शहरामध्ये 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत एच 3 एन 2 चे पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील 15 रुग्ण आढळले आहेत. तर, शहराच्या हद्दीबाहेरील 2 रुग्ण आढळले. उपचारानंतर 15 रुग्ण बरे झाले असून दोघांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

डॉ. गोफणे म्हणाले, शहरात एच 3 एन 2 चे रुग्ण आढळत असले तरीही नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. आत्तापर्यंत 15 रुग्ण बरे झाले आहे. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप आदी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये व दवाखान्यात औषधोपचार उपलब्ध आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच, आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा.

काय काळजी घ्याल ?
वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावे.
पौष्टिक आहार घ्यावा. भरपूर पाणी प्यावे.
पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी.
लिंबू, आवळा, मोसंबी, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.

 

Back to top button