पिंपरी : पवना धरणात ऑगस्टपर्यंतचा पाणीसाठा | पुढारी

पिंपरी : पवना धरणात ऑगस्टपर्यंतचा पाणीसाठा

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणार्‍या पवना धरणातील पाणीसाठा ऑगस्ट 2023 पर्यंत पुरेल इतका आहे. येत्या पावसाळ्यात एल निनो परिणामामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पाणीपुरवठ्यासंदर्भात अधिकार्‍यांशी मंगळवारी (दि.28) चर्चा केली.बैठकीस सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, अजय सुर्यवंशी, डी. डी. पाटील यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते. सध्या शहराला दिवसाआड एकूण 575 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे.

अपेक्षित पाऊस कमी झाल्यास  ऑक्टोबरअखेरीस पवना धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेऊन त्या अनुषंगाने जून 2024 अखेरपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यसाठीं बैठकीत चर्चा करण्यात आली. त्या सदंर्भातील पाणीपुरवठ्याबाबतीत आराखडा तयार करण्याचा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.खासगी बोअरवेल सर्वेक्षण आणि त्यांची दुरुस्ती करणे, आवश्यकतेनुसार बोअर व विहिरी अधिग्रहण करणेबाबत माहिती संकलित करणे, पाणी कपात धोरण निश्चित करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणे, पाणी गळती टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.

तसेच आंद्रा धरणातून निघोजे येथे 100 एमएलडी प्रतिदिन पाणी उपसा करून चिखली येथील नवीन केंद्रामधून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सुमारे 100 दशलक्ष लिटर पाणी तूट भरून काढण्यात येणार  आहे. यासह भामा आसखेड धरणातून 165 दशलक्ष लिटर पाणीउपसा करीता प्रकल्प गतिमान करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

Back to top button