लवणवाडीत 2 चिमुकल्यांसह पाच जणांचा अपघातात मृत्यू | पुढारी

लवणवाडीत 2 चिमुकल्यांसह पाच जणांचा अपघातात मृत्यू

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा :  जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून शेतमजुरीची कामे उरकून अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे आपल्या गावी जात असणार्‍या आदिवासी शेतमजुरांना नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने चिरडले. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. सुनंदाबाई रोहित मधे (वय 18), गौरव रोहित मधे (वय 6), रोहिणी रोहित मधे (वय दीड), नितीन शिवाजी मधे (वय 22) आणि सुहास यमा मधे (वय 25, सर्व रा. पळशी वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, की जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पारनेर तालुक्यातून शेतमजुरीसाठी मधे कुटुंब आले होते.

मजुरीची कामे उरकून सोमवारी रात्री ते मूळगावी जात होते. दुचाकीवरून ते घरी जात असताना रात्रीच्या सुमारास एका भरधाव पिकअप जीपने या आठ जणांना जोरात धडक दिली, त्यात ते चिरडले गेले. त्यात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे गावाला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. नगर-कल्याण महामार्गावर असणार्‍या लवणवाडी येथे हा भीषण अपघात झाला आहे. हे सर्व मजूर दोन दुचाकीवरून आपल्या घरी जात होते. अर्चना मधे, रोहित मधे आणि विकास मधे गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. अपघात इतका भयानक होता, की दुचाकीवरील 18 महिन्यांची मुलगी साईड गटारात पोलिसांना मिळून आली. आळेफाटा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Back to top button