

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार बापट गेल्या वर्षभरापासून फुफ्फुसांच्या आजाराने पीडित आहेत. त्यांना श्वसनाचाही विकार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ते सक्रिय राजकारणापासूनही दूर आहेत.
नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ते बाहेर पडलेले बघायला मिळाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालवली होती. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. याबाबत दिनानाथ रुग्णालयाकडून थोड्याच वेळात मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून खासदार बापट यांच्या प्रकृती बद्दल माहिती देण्यात येईल असेही निकटवर्तीयांकडून स्पष्ट करण्यात आले.