

किशोर बरकाले :
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व असलेल्या पुणे जिल्हा सहकारी उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या संचालकांमधील अंतर्गत मतभेद मासिक बैठकीच्या निमित्ताने समोर आले आहेत. 16 पैकी सात संचालक बैठकीस उपस्थित राहिले आणि उर्वरित संचालकांपैकी काहींनी अर्ज आणि काही अनुपस्थित राहिल्याने पक्षश्रेष्ठींसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. पदाधिकारी बदलासाठी हे दबावतंत्र तर नाही ना? अशीही चर्चा दुग्ध वर्तुळात सायंकाळी होती.
कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक चेअरमन केशरताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.28) कात्रजच्या मुख्यालयामध्ये झाली. या वेळी उपाध्यक्ष राहुल दिवेकर, ज्येष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के, विष्णू हिंगे, भगवान पासलकर तसेच दिलीप थोपटे, निखिल तांबे मिळून सात संचालक उपस्थित होते. तर पाच संचालकांना वैयक्तिक कारणामुळे संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहता येणार नसल्याचा लेखी अर्ज दिला होता आणि उर्वरित चार संचालक काही न कळविता गैरहजर राहिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संचालक मंडळामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
एकीकडे राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेल्या कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी लावलेली आहे. या चौकशीचे काम सुरू आहे. तसेच संघाची आर्थिक घडी विस्कटलेली असल्याची बाब चौकशीच्या दरम्यान प्रकर्षाने समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाच संचालकांचा लेखी अर्ज
कात्रज दूध संघाच्या चेअरमन केशरताई पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आजच्या बैठकीचे एकूण सात संचालक उपस्थित असल्याच्या माहितीस दुजोरा दिला. तर पाच संचालकांनी लेखी अर्ज दिलेला होता. मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे त्यांनी सांगितले.