सांस्कृतिक कार्यक्रमांचे महाराष्ट्रभर दौरे | पुढारी

सांस्कृतिक कार्यक्रमांचे महाराष्ट्रभर दौरे

सुवर्णा चव्हाण : 

बालनाट्य महोत्सव ते नृत्याच्या कार्यक्रमांपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांचे दौरे महाराष्ट्रभर होणार असून, पुण्यासह मुंबई, कोल्हापूर, सातारा, नाशिक, कोकण विभाग, नागपूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये कलाकार सादरीकरण करणार आहेत. सांस्कृतिक संस्थांकडून कार्यक्रमांसाठी 1 ते 3 लाखांपर्यंतचा खर्च केला जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये यंदाचा उन्हाळी सीझन सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा असून, नाट्यगृहांच्या तारखांचे बुकिंग झाले आहे.

विविध जिल्ह्यांमध्येही सांस्कृतिक कार्यक्रमांचे दौरेही आयोजित करण्यात आले आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या उन्हाळ्याच्या सुटीमुळे बालनाट्य महोत्सवांसह नाट्य कार्यशाळा, नृत्य महोत्सवांसह सांगीतिक महोत्सवही रंगणार आहेत. यात्रा-जत्रांसाठी लावणी महोत्सव, तमाशा कार्यक्रम, लोककला महोत्सवांसाठीही विचारणा होत आहे. संवाद पुणेचे सुनील महाजन म्हणाले की, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे दौरेही महाराष्ट्रभर रंगणार आहेत. कारण, हा सीझन प्रत्येक कलाकारासाठी कमाईचा असतो. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये कलाकार जाऊन आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे हा सीझन कलाकारांसाठी आर्थिक दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा आम्ही बालनाट्य महोत्सव आयोजित केला आहे.

जादूगार जितेंद्र रघुवीर म्हणाले की, उन्हाळ्याचा सीझन 15 एप्रिलनंतर सुरू होतो. तो जूनपर्यंत चालतो. या काळात आम्ही दरवर्षी जादूच्या प्रयोगांचे आयोजन करतो. शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने यंदाही विविध जिल्ह्यांमध्ये जादूचे प्रयोग होणार असून, त्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यासाठी बुकिंगही झाली आहे. मराठी तमाशा परिषदेचे संभाजीराजे जाधव म्हणाले की, तमाशा कार्यक्रमांचे दौरे महाराष्ट्रभर होणार असून, त्यासाठी विचारणाही होत आहे. तमाशा कार्यक्रमांच्या दौर्‍यांना सुरुवातही झाली आहे.

Back to top button