

येरवडा : वाघोलीतील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची व अंगणवाडीची इमारत मोडकळीस आली आहे. गेल्या वर्षापासून धोकादायक इमारतीत शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत आहेत. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शाळेची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व जी. के. फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप कटके यांनी केली आहे.
विठ्ठलवाडी येथील खाणपड जागेत ही शाळा आहे. या ठिकाणी अंगणवाडीसुद्धा आहे. वाघोली ग्रामपंचायत असताना अंगणवाडी इमारतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून 66 हजार रुपये मंजूर झाले होते. एका स्थानिक व्यक्तीने शाळा दुरुस्तीच्या कामाला अडथळा आणल्याने मंजूर झालेला निधी परत गेला आणि शाळेची दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यानंतर शाळेच्या वतीने कटके यांच्या माध्यमातून खाणपड जागा जिल्हा परिषदेला वर्ग करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह मुख्यमंत्री, महसूलमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.
शाळेच्या परिसरामध्ये झाडे-झुडपे व गवत वाढले आहे. तसेच शाळेलगत विहीर असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी, लाईट, शौचालय आदी सुविधांचा अभाव असल्याने महिला शिक्षिकांसह विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होत आहे. भिंतीला तडे गेले असून पावसाळ्यात छत गळत आहे.
या शाळेमध्ये 153 विद्यार्थी असून वर्गखोल्या मात्र दोनच आहेत. पटसंख्या जास्त असल्याने वर्गखोल्या अपुर्या पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. एक छोटेसे शौचालय आहे. परंतु, त्यामध्ये कचरा साचला आहे. या शाळेची दुरुस्ती करून खाणपड जागा जिल्हा परिषदेला वर्ग करावी व नवीन इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी कटके यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
या आहेत समस्या…
शाळा परिसरात झाडे-झुडपे, गवत वाढले.
पाणी, वीज आणि स्वच्छतगृहांचा अभाव.
भिंतीला तडे गेले असून पावसाळ्यात गळती.
153 विद्यार्थी असूनही वर्गखोल्या मात्र दोनच.
विठ्ठलवाडी परिसरात खाणपड व गायरानच्या जागा शासनाने ताब्यात घेऊन ती शाळा, हॉस्पिटल, क्रीडांगणासाठी उपलब्ध करून द्यावी. शासनाने वेळीच या जागेचा ताबा घेतला नाही, तर त्यावर अतिक्रमणे होऊ शकतात. तसेच काही ठिकाणी अतिक्रमणसुद्धा झाले आहेत.
– संदीप कटके, अध्यक्ष, जी. के. फाउंडेशन