अल निनोला घाबरण्याचे कारण नाही, समुद्री स्थिरांकही महत्त्वाचा ! : डॉ. कृष्णानंद होसाळीकर | पुढारी

अल निनोला घाबरण्याचे कारण नाही, समुद्री स्थिरांकही महत्त्वाचा ! : डॉ. कृष्णानंद होसाळीकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : यंदा अल निनोमुळे पाऊस कमी होणार, असे भाकीत जगभरातील शास्त्रज्ञांनी केलेले असले, तरीही त्याला लगेच घाबरण्याचे कारण नाही. पण, त्याकडेे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण, यापूर्वी अल निनो व ला निनाची स्थिती नसताना आपल्या देशात भरपूर पाऊस पडल्याची उदाहरणे आहेत. भारतीय समुद्री स्थिरांक हा घटक देखील महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे अल निनोला घाबरण्याचे कारण नाही, असे मत पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केले.

दै. ‘पुढारी’च्या कार्यालयात झालेल्या मुलाखतीत डॉ. होसाळीकर यांनी जागतिक हवामानासह आपल्या देशातील हवामानावर अनेक अभ्यासपूर्ण बाबी सांगितल्या. यंदा अल निनो सक्रिय होणार असल्याने भारतात दुष्काळ पडेल, असे भाकीत विदेशी शास्त्रज्ञांनी केले आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, दर 3-5 वर्षांनी अल निनो प्रशांत महासागरात अ‍ॅक्टिव्ह होतो. गेल्या 50 ते 60 वर्षांत तो 16 ते 17 वेळा अ‍ॅक्टिव्ह झाला तेव्हा 9 वेळा देशातला पाऊस कमी झाला होता. म्हणजेच, एकास एक असे समीकरण मांडता येत नाही. या आधी अशी काही वर्षे येऊन गेली, ज्यात अल निनो अ‍ॅक्टिव्ह होता तेव्हा आपल्या देशात भरपूर पाऊस पडलेला आहे.

आयओडी देखील महत्त्वाचा आहे
डॉ. होसाळीकर म्हणाले, पावसासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात. त्यात अल निनो इतकाच आयओडी (इंडियन ओशियन डायपोल) अर्थात भारतीय समुद्री स्थिरांक महत्त्वाचा असतो. युरेशियात जे बर्फाळ आच्छादन आहे, त्यावरही आपला पाऊस अवलंबून असतो. अल निनोची वारंवारिता 2 ते 5 वर्षे, तर ला निनाची वारंवारिता त्यापेक्षा जास्त वेळा असते.

सूर्यावरच्या डागांचा परिणाम होत असेल…
सूर्यावरच्या डागांचाही पावसावर परिणाम होतो का? या प्रश्नावर डॉ. होसाळीकर म्हणाले, हा अभ्यास स्वतंत्रपणे करणारे शास्त्रज्ञ आहेत. मी प्रामाणिकपणे सांगतो की, हवामान विभाग हे काम करीत नाही. मी इतके सांगू शकतो की, वेद व उपनिषदांत याचे उल्लेख आढळतात की, सूर्य सृष्टीच्या केंद्रस्थानी आहे. मनुस्मृतीमध्ये ‘आदित्यात जायते वृष्टी’ असा उल्लेख आहे. हे सूत्र आयएमडीच्या लोगोवर आहे. सृष्टीवरचे जलचक्र त्याही काळात माहीत होते.

खारफुटीची जंगलं महत्त्वाचीच…
खारफुटीची जंगलं नष्ट झाल्याने देखील चक्रीवादळाचा किनारपट्टीला धोका वाढला असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात? या प्रश्नावर ते म्हणाले, आमच्या भाषेत त्याला ‘बफर ब्लॉक’ म्हणतो. समुद्राच्या पाण्यात येणारी ही एकमेव वनस्पती आहे. ती समुद्राकडून येणार्‍या जोरदार वार्‍याचा वेग कमी करते. तसेच, पाण्याला जमिनीकडे येण्यापासून रोखते. त्यामुळे हे झाड तोडण्याला कायद्याने बंदी आहे. ही वनस्पती समुद्राच्या किनारपट्टीवर उधळणार्‍या लाटांपासून जमिनीची झीज रोखते.

Back to top button