

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 होती, ती वाढवून सरकारने आता 30 जून 2023 ही अंतिम तारीख दिल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.मात्र आयकर विभागाचा सर्व्हर सतत डाऊन राहत असल्याने पॅन-आधार जोडणीमध्ये अडचण निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पॅनकार्ड हे आधारशी लिंक करणे बंधनकारक केल्यानंतर भाजीविक्रेत्यापासून ते छोट्यातला छोटा व्यावसायिक कामाला लागला होता. कारण 31 मार्चपर्यंत ते लिंक न झाल्यास बँक खात्यासह सर्व व्यवहार रोखले जाणार होते. या अडचणी टाळण्यासाठी प्रत्येक जण धावत होता. अशातच गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाचे सर्व्हर डाऊन झाल्याच्या प्रकारामुळे प्रत्येकाला अडचण निर्माण झाली होती.
पॅनकार्ड लिंक न होणे हे समजू शकत होते, मात्र दंडाबरोबर ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी खूप कसरत करावी लागणार असल्याने अनेक जण चिंताग्रस्त झाले होते. त्यातच दंडही आकारण्यात येणार होता. मात्र, सरकारने ही मुदत 30 जूनपर्यंत वाढविल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. प्रत्यक्षात केंद्रीय कर मंडळाने 2017 मध्येच पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याचे आदेश जारी केले होते. नागरिकांनी त्यावेळीही तत्परता न दाखविल्याने अंतिम मुदत मार्च 2020 ही दिली होती. आता पुन्हा अडचणी येऊ नयेत यासाठी 30 जून 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीतदेखील नागरिकांनी आधार लिंक केले नाही तर प्रत्येकी 1 हजारांचा दंड होणार आहे.
80 वर्षांच्या ज्येष्ठांनाच सूट……
फक्त 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठांना त्यांचे पॅन आधारशी लिंक करण्यातून सूट देण्यात आली आहे. यासोबतच अनिवासी भारतीय, आसाम, मेघालय व जम्मू-कश्मीरमधील नागरिकांनाही ही सूट देण्यात आली आहे.
शासनाने पॅनकार्ड लिंक करण्याची वाढवलेली मुदत योग्य असली तरी लिंक करताना आधारमधील दुरुस्ती नागरिकांना अडचणीची ठरत आहे. विशेषत: महिलांचे लग्नापूर्वीचे व नंतरचे नाव अशा प्रकारच्या दुरुस्ती अनेकदा होत नाहीत. यामुळे लिंक करताना ते सबमिट होत नाही.
– गणेश कल्याणकर, मोफत आधार लिंक सेवा केंद्र.