पुणे पालिकेच्या शिष्यवृत्तीचे 100 टक्के वाटप | पुढारी

पुणे पालिकेच्या शिष्यवृत्तीचे 100 टक्के वाटप

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या वतीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीचे 100 टक्के वाटप झाले असून, 8 हजार 669 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 15 कोटी 17 लाख 5 हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली. महापालिकेच्या हद्दीत राहणार्‍या दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त, तर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी आणि 40 टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना 65 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना 15 हजार आणि बारावीसाठी 25 हजार रुपये दिले जातात.

मार्चअखेरपूर्वीच अर्ज आलेल्यांपैकी सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे जमा करण्यात आले आहेत. या वर्षी महापालिकेकडे दहावीसाठी सुमारे 8 हजार 4 अर्ज आले होते. त्यापैकी 6 हजार 502 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. या सर्वांच्या बँक खात्यात 9 कोटी 75 लाख 30 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. दहावीच्या शिष्यवृत्तीसाठी प्राप्त अर्जांतील 1 हजार 502 अर्ज अपात्र ठरले आहेत. इयत्ता बारावीसाठी 2 हजार 544 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 2 हजार 167 अर्ज पात्र झाले असून, त्यांच्या बँक खात्यात 5 कोटी 41 लाख 75 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. बारावीसाठी प्राप्त अर्जांमधील 377 अर्ज अपात्र ठरले. अपात्र ठरलेल्या अर्जांमध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी चार ते पाच अर्ज सादर केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या सर्व अर्जांची छाननी करून, एकापेक्षा जास्त असलेले अर्ज बाद करण्यात आले आहेत.

Back to top button