भीमा खोऱ्यातील पूर व्यवस्थापनासाठी एकात्मिक नियोजनाची गरज, अभ्यास समितीचा अहवाल शासनास सादर | पुढारी

भीमा खोऱ्यातील पूर व्यवस्थापनासाठी एकात्मिक नियोजनाची गरज, अभ्यास समितीचा अहवाल शासनास सादर

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही वर्षात झालेली तापमान वाढ, कमी कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणे, काही भागात अचानक मुसळधार पाऊस होणे, ढगफुटीच्या घटना, दुष्काळ सदृश्य परिस्थिती यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. याबरोबरच निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे होणारे वातावरणीय दुष्परिणाम म्हणजे निसर्गाने दिलेले आगामी संकेतच आहेत. ते वेळीच ओळखून आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलायला हवीत. तरच पूरपरिस्थिती रोखू शकतो, असा निष्कर्ष भीमा खोऱ्यातील पूर परिस्थितीचा तांत्रिक अभ्यास आणि विश्लेषण करून त्याची कारणे शोधणे व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजाना सुचविणे यासाठी गठीत केलेल्या वरिष्ठ तज्ज्ञांच्या पूर अभ्यास समितीने काढला आहे.

भीमा खोऱ्यातील पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त सचिव राजेंद्र पावर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने भीमा खोऱ्याचा विविध अंगाने सविस्तर अभ्यास करून अहवाला शासनास सादर केला. यावेळी समितीचे सदस्य अविनाश सुर्वे, राजेंद्र मोहिते, विवेकानंद घारे यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर आणि अप्पर मुख्य सचिव मद्त व पूर्नवसन असिम गुप्ता यांच्याकडे सुपूर्त केला. या समितीचे अध्यक्ष जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव राजेंद्र पवार हे असून, या समितीमधेय देशपातळीवरील हवामान, भारतीय औष्णिक हवामान विभाग, एमआरएसएसी, सीडब्लुसी, आयआयटी येथील विशेष तज्ञ अविनाश सुर्वे, विनय कुलकर्णी हेही या समितीचे सदस्य आहेत.

या पूर्वी जुलै 2019 मध्ये कृष्णा नदीपात्राच्या महापुरावेळी कृष्णा खोऱ्याचा तांत्रिक अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी जलसंपदा विभागाने सेवानिवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अभ्यास समिती शासनाने नेमली होती. या समितीने देखील अहवाल 2020 मध्ये शासनास सादर केला होता. त्यातील बहुतांश शिफारशी शासनाने स्वीकारून त्यावर कार्यवाही सुरू केली आहे.

भीमा खोऱ्यातील पूर परिस्थितीचा या समितीने केलेल्या तांत्रिक अभ्यासात अनेक महत्वपूर्ण निष्कर्ष काढले आहेत. त्यामध्ये वातावरणीय बदलामुळे झालेली अतिवृष्टी, पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा, पवना या नद्या व त्यांच्या उप नद्या यांच्या जलप्रवाह क्षेत्रात झालेली विकासकामे, अतिक्रमण झालेल्या इमारती, नदीपात्रात टाकण्यात आलेला राडारोडा यामुळे नद्यांच्या पूर वहन क्षमतेचे आकुंचन झाले आहे. याबरोबरच शहरातील पर्जन्य वाहिकांची दुरावस्था व नियोजनाचा अभाव या सह इतर विविध कारणे पूर परिस्थितीला जबाबदार आहेत. विशेषत: निर्सगातील मानवी व अतिरेकी हस्तपेक्षामुळे वातावरणीय बदलांमुळे दुष्परिणामास सामोरे जावे लागत आहे, असे या समितीने नमूद केले आहे. हे सर्व बदलावयाचे असेल तर दीर्घकालीन उपाय योजनांवर भर दिला पाहिजे. त्यासाठी परदेशातील तसेच देशांतर्गत इतर अनेक पूरप्रवण राज्यातील पूर नियोजनाबाबतची धोरणे, त्यांनी केलेल्या उपाय योजना यांचे दाखले घेऊन जागतिक आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन भीमा खोऱ्यातील सुनियोजित पूर व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे समितीने सूचविले आहे.

 

Back to top button