पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर पुलासाठी ५ कोटी मंजूर, शिवापूर रस्त्यांसाठीही १७ कोटींचा निधी | पुढारी

पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर पुलासाठी ५ कोटी मंजूर, शिवापूर रस्त्यांसाठीही १७ कोटींचा निधी

खडकवासला, पुढारी वृत्तसेवा: पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर येथील धोकादायक पुलाच्या कामासाठी शासनाने अखेर पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच, सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या शिवापूर रस्त्यांसाठीदेखील १७ कोटी मंजूर केले आहेत. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची प्रशासनाने दखल घेतली आहे. हे कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सोनापूर येथील धोकादायक पूल, तसेच सिंहगड भागातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाकडे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले होते. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबत लवकरच बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर बांधकाम मंत्र्यांनी आमदार तापकीर, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप यांच्या समवेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोनापूर येथील धोकादायक पुलासह हायब्रिड ॲन्युईटी योजनेतील कामांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी दोन्ही कामांसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात येत असल्याचे सांगितले.

तापकीर म्हणाले, ‘पानशेत रस्त्यावरील सोनापूर व रुळे गावच्या हद्दीवरील पुलाला भगदाडे पडून रस्ता खचला. त्यामुळे पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. दुरुस्ती करून अनेक वर्षांपासून पूल व दोन्ही बाजूचा रस्ता खचत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करून पूल उभारण्यासाठी ५ कोटी व शिवापूर-सिंहगड रस्त्यासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.’

सोनापूर पूल व दोन्ही बाजूला खचलेल्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तज्ज्ञांमार्फत या पुलाची पाहणी केली जाईल. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून महिनाभरात हे काम सुरू केले जाणार आहे. शिवापूर रस्त्याचेही काम सुरू केले जाणार आहे.

-अजय भोसले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Back to top button