पुण्यात मोबाईल चोरट्यांनंतर आता सोनसाखळी चोरटे झाले अ‍ॅक्टीव्ह, एकाच दिवशी घडल्या चार घटना | पुढारी

पुण्यात मोबाईल चोरट्यांनंतर आता सोनसाखळी चोरटे झाले अ‍ॅक्टीव्ह, एकाच दिवशी घडल्या चार घटना

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात एकीकडे मोबाईल चोरीच्या घटना घडत असताना दुसरीकडे आता सोनसाखळी चोरटे देखील मोठ्या प्रमाणावर अ‍ॅक्टीव्ह झाल्याचे पहायला मिळत आहे. एकाच दिवसात शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या चार घटना घडल्या आहेत. या चार घटनांमध्ये तीन लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज चोरून नेला. पर्वती पायथा, कात्रज-कोंढवा रस्ता आणि बिबवेवाडी भागात या घटना घडल्या.

पर्वती गाव परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 75 हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील एक लाख 35 हजार रुपयांचे मंगळसूत्र, लक्ष्मीहार असा एक लाख 35 हजार रुपयांचा ऐवज दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. महिलेने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिबवेवाडी भागात सकाळी पावणे आठच्या सुमारास एका महिलेची एक लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना सकाळी सहा ते आठ या वेळेत घडल्या आहेत. बिबवेवाडी, पर्वती पायथा तसेच कात्रज-कोंढवा रस्त्यावर दागिने हिसकावण्याच्या घटना एकपाठोपाठ घडल्या. वेगवेगळ्या भागात दागिने हिसकावणारे चोरटे एकच असावेत असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Back to top button