लाकडांचा विनापरवाना साठा अन् वाहतूक, बारामतीतील के. के. पेढा दुकानावर वन विभागाची कारवाई | पुढारी

लाकडांचा विनापरवाना साठा अन् वाहतूक, बारामतीतील के. के. पेढा दुकानावर वन विभागाची कारवाई

बारामती, पुढारी वृत्तसेवा: वन विभागाच्या अनुसूचीतील कडूनिंब वृक्षाच्या लाकडाची विनापरवाना तोड, वाहतूक व साठा केल्याबद्दल बारामतीतील कसबा येथील के. के. पेढा या दुकानावर वन विभागाने कारवाई करीत तब्बल एक टन कडुनिंबाचे लाकूड जप्त केले आहे.

के. के. पेढा या दुकानात मोठ्या प्रमाणात कडुनिंब जातीच्या वृक्षाचे लाकूड विनापरवाना साठवून बॉयलरसाठी वापर होत असल्याची तक्रार वन विभागाकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीची शहानिशा करीत बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचार्‍यांकडून पाहणी करीत कारवाई करण्यात आली.

भारतीय वन अधिनियम 1947 च्या कलम 41 (2) अन्वये के. के. पेढा या दुकानाचे मालक रमेश शिर्के व ओमप्रकाश यादव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. बारामतीचे वनपाल हेमंत मोरे, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, अंकुश माने, वन कर्मचारी प्रकाश लोंढे यांनी ही कारवाई केली.

याबाबत बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर म्हणाल्या की, लाकडाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. वनपालांकडून या प्रकरणाचा तपास करीत त्याचा अहवाल सहायक वनरक्षकांकडे पाठविला जाईल. सहायक वनरक्षकांना अर्धन्यायिक अधिकार असतात. त्यांच्या स्तरावर पुढील कारवाई होईल.

Back to top button