धक्कादायक ! चार वर्षीय पोटच्या मुलीचा आईनेच केला खून | पुढारी

धक्कादायक ! चार वर्षीय पोटच्या मुलीचा आईनेच केला खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आईने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीचा चाकूने भोसकून खून केला. वैष्णवी महेश वाडेर ( वय. अंदाजे 4) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई कल्पी हिला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी ( दि. 27) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटी ससाणे नगर येथे घडली आहे. दरम्यान तिने हा खून कोणत्या कारणातून केला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महीला ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. 23 दिवसापूर्वी ती तेथे राहण्यास आली होती. बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय महिला करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती. त्यामुळे घरमालक तेथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता.

शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. घरमालक व शेजाऱ्यांनी आत जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. खून करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Back to top button