

बारामती, पुढारी वृत्तसेवा: दुय्यम निबंधक कार्यालयात नोकरीला असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देतो, त्यापोटी प्रोसेसिंग फी जमा करा, असे सांगत एकाने अनेक लोकांना सव्वादोन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार बारामतीत उघडकीस आला. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल केला. आदित्य संदीप पाटोळे (रा. काटेवाडी, ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. रणजित राजेंद्र आटोळे (रा. सावळ, ता. बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली.
फिर्यादीचा सुभद्रा माॅलमध्ये कॅफे काॅफी डिलाईट नावाचे दुकान आहे. तेथे पाटोळे हा नियमित येत असताना त्यांची ओळख झाली होती. त्याने मी बारामती दुयम निबंधक कार्यालयात नोकरीस असल्याचे सांगून शासनाच्या विविध योजनांमध्ये लोकांना मदत मिळवून देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ४ मार्च रोजी कॅफेवर फिर्यादीसह त्यांचे मित्र निलेश जगताप, किरण सुतार हे असताना पाटोळे याने महात्मा फुले योजनेतून तुम्हाला १० लाखांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आदीची माहिती घेतली. तर प्रोसेसिंग फी पोटी तुम्हाला प्रत्येकी १६ हजार रुपये भरावे लागतील, असेही त्याने सांगितले.
त्यानुसार फिर्यादीसह त्यांच्या दोन मित्रांनी ही रक्कम फोन पे, गुगल पेद्वारे पाठवली. कर्ज प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्याने कर्ज मंजूर झाले आहे, चेक तयार झाले की कळवतो, असे सांगितले. परंतु त्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीला शंका आल्याने त्यांनी दुयम निबंधक कार्यालयात जात चौकशी केली असता, असा कोणताही व्यक्ती कामाला नसल्याचे कळाले. त्यामुळे पाटोळेने फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या तीन जणाव्यतिरिक्त पाटोळेने दशरथ किसान लिंगााडे, अंकुश साठे, ओंकार ननवरे, आदेश तुपे, ओंकार पवार, सुजित बनकर याांनाही ४८ हजारांची तर विलास लोणकर यांची १ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. बारामती तालुका पोलिस पुढील तपास करत आहेत.