बारामती: मुलाच्या बनावट सह्या करत डाॅक्टर महिलेची फसवणूक, मुलगा असतो कॅनडामध्ये | पुढारी

बारामती: मुलाच्या बनावट सह्या करत डाॅक्टर महिलेची फसवणूक, मुलगा असतो कॅनडामध्ये

बारामती, पुढारी वृत्तसेवा: कॅनडामध्ये असलेल्या मुलाच्या बनावट सह्या करत, बनावट महिला उभी करून एका महिला डाॅक्टरांची जमीन हडप करण्याचा प्रकार बारामतीत घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीसह बनावट कागदपत्रे तयार करणे व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

विद्या शांताराम शिंदे (रा. हेरिटेज सोसायटी शास्त्रीनगर, येरवडा, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली. मंगेश विलास काळे (रा. रामवाडी, गोपाळवाडी, ता. दौंड), एक अनोळखी महिला, राहूल सुरेश माने (रा. दौंड), किरण पाटील (रा. थेरगाव, पुणे) आणि शिवराज हनुमंत थोरात (रा. सूर्यनगरी, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी या व्यवसायाने डाॅक्टर आहेत. त्यांचा मुलगा रोहित यशवंत डोईफोडे हा चार वर्षांपासून कॅनडा येथे आहे. फिर्यादी या वडीलांकडील नाव लावतात. त्यांनी १९९४ मध्ये बारामतीत डाॅ. कमलाकर कोल्हटकर यांच्याकडून ५८२.६२ चौ. मी. क्षेत्र कायम खुशखरेदीने घेतले होते. त्या वैद्यकीय व्यवसायात व्यस्त असल्याने हा प्लाॅट पडून होता. त्यानंतर १२ मार्च २०२३ रोजी वृत्तपत्रातील नोटीस वाचल्यावर हा प्लाॅट मंगेश काळे याच्या नावे असल्याचे फिर्यादीला समजल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या मुलाचा मित्र ऋषिकेश जगताप यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून याची माहिती घेतली, त्यावेळी हा प्लाॅट काळे या व्यक्तीने हवेली येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस महिला उभी करत कुलमुखत्यार करून घेतला असल्याचे लक्षात आले. त्यावर अनोळखी महिलेने फिर्यादीची सही केली आहे. या कुलमुखत्यार दस्ताला साक्षीदार म्हणून राहुल माने व किरण पाटील यांच्या सह्या आहेत. त्यांनाही फिर्यादी ओळखत नाहीत.

त्यानंतर काळे याने कुलमुखत्यार पत्राच्या आधारे बोगस महिला उभी करून बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात फिर्यादीचा प्लाॅट १३ लाख रुपयांना खुशखरेदी करून घेतल्याचे दिसून आले. त्यासाठी पुन्हा त्याच महिलेचे फोटो जोडून फिर्यादीची बनावट सही केली आहे. साक्षीदार म्हणून रोहित डोईफोडे यांची खोटी सही केली आहे. परंतु फिर्यादीचा मुलगा रोहित हा या काळात कॅनडा येथेच होता. अजूनही तो तिकडेच आहे. या खरेदीदस्तावर शिवराज थोरात याने ओळखीची सही केली आहे. तसेच फिर्यादीने प्लाॅटमध्ये लावलेला फलक काढून टाकण्यात आला आहे. फिर्यादीने बारामती तलाठी कार्यालयात माहिती घेतली असता काळे याने त्यांचे नाव कमी करून स्वतःचे नाव लावत फेरफार मंजूर करून घेतला आहे. त्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी हितसंबंधितांना नोटीस बजावल्याचे नमूद केले आहे. परंतु अशी कोणतीही नोटीस फिर्यादीला आलेली नाही.

Back to top button