तळेगाव दाभाडे : 34 थकीत मालमत्ता करधारकांचे पाणी कनेक्शन तोडले | पुढारी

तळेगाव दाभाडे : 34 थकीत मालमत्ता करधारकांचे पाणी कनेक्शन तोडले

तळेगाव दाभाडे : परिषद प्रशासनाने 34 थकीत मालमत्ता करधारकांचे पाणी कनेक्शन तोडले आहे. तसेच, व्यावसायिक व रहिवासी अशा एकूण 106 मालमत्ता सील करून जप्तीची कारवाई केली आहे. या जप्त केलेल्या मालमत्तांचे जाहीर लिलाव करुन थकीत कर रक्कम वसूल करणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.

सुटीच्या दिवशीही कर भरणा सुरू
शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या व पुढील काळात करावयाच्या विकासकामांसाठी कराचा निधी वापरला जातो. नागरिकांना सुलभतेने मालमत्ता कर व पाणीपट्टी भरता यावी याकरिता 31 मार्च अखेरपर्यंत सर्व शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशीदेखील नगर परिषद कार्यालय खुले ठेवले आहे.

10 मोबाईल टॉवर्स सील
आज अखेर सुमारे 18 कोटी 60 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. शहरामध्ये एकूण 27 मोबाईल टॉवर्स असून, 17 टॉवर्सनी मालमत्ता कर भरला आहे. तर, उर्वरित 10 टॉवर्स नगर परिषदेने सील करून जप्तीची कारवाई केली आहे.

6 वसुली पथकांची नेमणूक
थकबाकी वसूल करण्यासाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 विशेष फिरत्या वसुली पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके थकबाकीदारांच्या घरी समक्ष जाऊन कर वसुली करत आहेत, असे कर निरीक्षक विजय शहाणे यांनी सांगितले.

  • जप्ती केलेल्या मालमत्तांचा होणार लिलाव
  • करभरणा करण्यासाठी कॅशलेश सुविधा उपलब्ध
  • 31 मार्च अखेरपर्यंत शनिवार, रविवार, सुटीच्या दिवशीही कार्यालय राहणार सुरू

कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांत अनेक नागरिकांनी कर भरणा केला नव्हता. यामुळे थकबाकीची रक्कम वाढली आहे. त्याकाळात नगर परिषदेने कराच्या वसुलीसाठी कारवाई केली नव्हती. आता मात्र वसुलीसाठीची कडक कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी कराचा भरणा करावा.

                           – विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, तळेगाव नगर परिषद

Back to top button