मालोजीराजे गढीसंवर्धनाचा आराखडा सादर करा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : येथील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिव (पर्यटन) यांना बृहत् आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत यासंदर्भात शनिवारी (दि. 25) भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गढीसंवर्धन व स्मारकासाठी निधी देण्यास शिवसेना-भाजप सरकार कटिबद्ध असल्याचा निर्वाळा दिला.
पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे यांचे वास्तव्य असलेल्या इंदापूर येथील ऐतिहासिक गढीसंदर्भात माहिती दिली. इंदापूर येथे सन 1606 मध्ये झालेल्या युद्धात मालोजीराजे यांना वीरमरण आले. त्यांची समाधी त्यांचे वास्तव्य असलेल्या पुरातन गढीसमोरील जागेत होती. याची नोंद 'शिवभारत' ग्रंथात आढळून येते. सदरच्या गढीमध्ये तहसील कार्यालय, न्यायालय यांचे कामकाज चालत होते.
मात्र, सदरची कार्यालये नूतन इमारतीत स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे या गढीच्या संवर्धनासंदर्भात शासकीय कागदपत्रांनुसार हस्तांतरण करून, गढीला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन सदर ठिकाणी वीरश्री मालोजीराजेंचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचा बृहत् आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांना पाटील यांनी केली. त्यावर बृहत् आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.