पुणे : वाडा पशुवैद्यकीय दवाखाना समस्यांच्या गर्तेत | पुढारी

पुणे : वाडा पशुवैद्यकीय दवाखाना समस्यांच्या गर्तेत

आदेश भोजने : 

वाडा : गेले काही वर्षे वाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना उपचारासाठी वेळेत डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. वाडा व परिसरातील पशुपालक व शेतकरी बेजार झाले असून, त्यांना खासगी डॉक्टरांकडून जनावरांवर उपचार करून घ्यावे लागत आहेत.
दवाखान्याला सुसज्ज अशी इमारत असून, येथे निवासी डॉक्टरसाठीही रूम आहेत. मात्र, तरीही अनेक वर्षे येथे कोणी राहण्यास नसल्याने त्याची दुरवस्था झालेली आहे. दवाखान्यास कुठेही पाटी लावलेली नसून हा दवाखाना नेमका कोठे आहे, याचा शोध पशुपालकांना घ्यावा लागतो. येथे 4 पदे असून, पशुधन विकास अधिकारी हे पद 4 वर्षांपासून रिक्त आहे.

सहायक पशुधन अधिकारी, शिपाई अशा दोन जागांवर कर्मचारी आहेत. ड्रेसर या जागेवर कर्मचारी असून, तो पंचायत समितीत काम करीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दवाखान्याच्या शेजारीच डॉक्टरांना राहण्यासाठी सुसज्ज इमारत असून, तीही गेली कित्येक वर्षे अशीच उभी आहे. तिचे सांडपाण्याचे चेंबर फुटलेले असून, शौचालयाच्या टाकीचे चेंबर फुटून त्यावर कोणतेही झाकण नसल्याने ते धोकादायक स्थितीत आहे. जवळच मराठी शाळा असल्याने विद्यार्थी त्या ठिकाणी खेळायला येत असतात. अशा वेळी या उघड्या चेंबरमध्ये पडून अपघात घडू शकतो. वाडा व परिसरात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. बिबट्याचे हल्ले, सर्पदंश अशा घटना घडत असतात. अशा वेळी पशुपालकांना पशुवैद्यकीय दवाखाना नेहमी बंद असल्याचाच
अनुभव येतो.

वाडा पशुवैद्यकीय दवाखान्यात 4 जागा आहेत. पशुधन अधिकारी ही जागा 4 वर्षांपासून रिक्त असून, ड्रेसर पदावरील कर्मचारी पंचायत समितीला काम पाहत आहेत. येथील अधिकारी हे फिरतीवर जाऊन उपचार करीत असल्याने दवाखाना बंद राहत आहे.
                                         – डॉ. योगेश शेळके, पशुधन विकास अधिकारी

वाडा परिसर डोंगराळ असल्याने येथील पशुपालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गंभीर अवस्थेतील पशूंना वेळेत उपचार मिळत नाहीत. येथे कायमस्वरूपी निवासी डॉक्टर नेमावा.
                                                                        – रूपाली मोरे, सरपंच वाडा

Back to top button