

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : जुन्नरलगतच्या मानमोडी डोंगरातील भूत लेणीसमूह येथे लेणी पाहण्याकरिता मुंबईहून आलेल्या 11 पर्यटकांवर मधमाश्यांनी जोरदार हल्ला केला. यामध्ये पाच पर्यटक गंभीर जखमी झाले. मुलुंड, नेरुळ, डोंबिवली येथून पर्यटक या लेणी पाहण्यासाठी आले होते. लेणी पाहत असताना त्यांच्या मोबाईलच्या दिव्याचा प्रकाश पडल्याने लेण्यांमध्ये असणार्या मोहळावरील मधमाश्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पर्यटकांनी घाबरून आपले जवळचे सामान व मोबाईल फोन तेथेच टाकून पळ काढला.
तरीही मधमाश्यांनी पाठलाग करून त्यांना चावे घेतले. त्यांच्या जहरी दंशामुळे पर्यटक जखमी झाले. जुन्नरमधील रुग्णवाहिकाचालक प्रशांत कबाडी याने तेजस शिंदे, रमेश खरमाळे, दीपक सांगडे यांच्या मदतीने या जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी आणले. यापैकी आरती वाघमारे, सुवर्णा कांबळे, प्रियदर्शन कांबळे, पंडित थोरात, पुष्पावती कांबळे यांना उपचारांसाठी नारायणगाव येथे खासगी दवाखान्यात पाठविण्यात आले.