पुण्यात फळभाज्यांची उच्चांकी आवक | पुढारी

पुण्यात फळभाज्यांची उच्चांकी आवक

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 26) फळभाज्यांची हंगामातील उच्चांकी आवक नोंदविण्यात आली. बाजारात आलेल्या बहुतांश मालाची विक्रीही झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

गुलटेकडी मार्केट यार्डात सकाळपासूनच ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. राज्य आणि परराज्यातून मिळून येथील बाजारात सुमारे 125 ट्रक आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत आवक 25 ट्रकने वाढल्याचे सांगण्यात आले.

परराज्यातून आलेल्या मालामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात येथून सुमारे 15 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून 4 टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून 4 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 5 ट्रक गाजर, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंगा, मध्य प्रदेश येथून मटार 1 ट्रक, कर्नाटक आणि तर आंध्र प्रदेश येथून 15 टेम्पो तोतापुरी कैरी, मध्यप्रदेश आणि गुजरात येथुन लसूण सुमारे 10 ट्रक आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे एक हजार गोणी, टोमॅटो सुमारे 10 हजार पेटी, कोबी आणि काकडी प्रत्येकी 8 टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे 5 टेम्पो, सिमला मिरची आणि फ्लॉवर प्रत्येकी 10 टेम्पो, कांदा सुमारे 150 ट्रक, इंदौर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची 40 ट्रक इतकी आवक झाली होती.

वातावरण बदलामुुळे पालेभाज्यांचा दर्जा घसरला

लहरी वातावरणामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सकाळच्या सुमारास थंडी व दुपारी कडक उन पडत असल्याने बहुतांश पालेभाज्यांच्या दर्जात घसरण झाली असून पालेभाज्या पिवळ्या पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी (दि. 26) मार्केट यार्डात कोथिंबिरीची दीड लाख जुडी आवक झाली. मेथीची 60 हजार जुड्या आवक झाली होती. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक 25 हजार तर मेथीची आवक 10 हजार जुड्यांनी घटली.

बाजारातील मागणीच्या तुलनेत आवक कमी राहिल्याने किरकोळ बाजारात मेथीच्या भावात जुडीमागे पाच रुपयांनी वाढ झाली. तर, दर्जा घसरल्याने पालकच्या भावात दोन ते पाच रूपयांनी घसरण झाली. उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. घाऊक बाजारात एका जुडीची 4 ते 10 रुपये तर किरकोळ बाजारात एका गड्डीची 8 ते 20 रुपये दराने विक्री सुरू होती.

Back to top button