भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावे बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली तीन कोटींची खंडणी | पुढारी

भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावे बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली तीन कोटींची खंडणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पाटील, ताकवणे यांच्या विरुद्ध खंडणी, धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पौड रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, त्यांच्या मावसभावाचा नावाचा वापर करुन त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी दिली.

आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला. बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे तपास करत आहेत. दरम्यान यापूर्वी देखील शहरात अशाच प्रकारे राजकीय नेत्यांच्या नावांचा वापर करून, त्यांच्या पीएचे  नाव वापरून खंडणी मागितल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामध्ये आरोपींनी विशिष्ट अशा सॉफ्टवेअरचा वापर केला होता.

Back to top button